पिंपळवंडी, ता. १६ : काळवाडी (ता. जुन्नर) ग्रामपंचायतीला मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने इलेक्ट्रिक घंटागाडी भेट देण्यात आली आहे.
पंचायतराज अभियान अंतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायती त्यांच्या गावात विविध कामे करत असून, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पर्यावरण व स्वच्छतेसाठी चांगले काम करणाऱ्या ग्रामपंचायतींचा इलेक्ट्रिक घंटागाडी देऊन सन्मान करण्याचा अभिनव उपक्रम पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने सुरू आहे.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, हवेली पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी जयश्री बेनके, सरपंच तुषार वामन, उपसरपंच बाबासाहेब वामन, ग्रामविकास अधिकारी आर. के. जाधव, सदस्य रघुनाथ बेल्हेकर, अनिकेत शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.
काळवाडी ग्रामपंचायतीने यापूर्वी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात वर्ष २०२०- २१ व २०२१- २२ मध्ये राज्यस्तरीय तृतीय क्रमांक प्राप्त केला होता. आतापर्यंत काळवाडी गावास यशवंत पंचायत राज अभियान, पर्यावरण विकास रत्न स्मार्ट ग्राम पुरस्कार व इतर अनेक पुरस्कार ग्रामस्थांच्या सहकार्याने मिळाले असल्याचे ग्रामविकास अधिकारी आर. के. जाधव यांनी सांगितले. हे अभियान यशस्वी राबविण्यासाठी सुनील वामन यांच्या अध्यक्षतेखाली अभियान समिती स्थापन करण्यात आली. या समितीमार्फत गावात विविध कामे सुरू असून, यात प्रत्येक घरासमोर आरोग्यदायी परसबाग, नव्याने उभे राहत असलेले कृषी पर्यटन ग्रामकाळवाडी, घनकचरा व्यवस्थापन आदी उपक्रम ग्रामस्थांच्या सहकार्याने सुरू आहेत.
यावर्षी पंचायतराज अभियानात गावाने तालुक्यात सर्वाधिक लोकवर्गणी जमा केली. तसेच, १०० टक्के कर वसुली करणे, लोकसंख्येच्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन आदी कामे या अभियानात केल्यामुळे ग्रामपंचायतीची सन्मान जिल्हा परिषद मार्फत करण्यात आला. यावेळी सरपंच तुषार वामन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आभार मानले.
02744