वयाची 39 वर्षे पूर्ण झाली असतानाही डेव्हिड वॉर्नर (David Warner) प्रतिस्पर्धी गोलंदाजांची अक्षरशः पळता भुई थोडी करताना दिसत आहे. सध्या सुरू असलेल्या ‘बिग बॅश लीग’मध्ये (BBL) वॉर्नरची फलंदाजी धावांचा पाऊस पाडत आहे. अवघ्या 16 दिवसांच्या आत वॉर्नरने यावर्षी 2 शतके आणि 2 अर्धशतके झळकावली आहेत.
सिडनी सिक्सर्स विरुद्धच्या सामन्यात वॉर्नरने आपल्या तुफानी फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली. त्याने 65 चेंडूंत 11 चौकार आणि 4 उत्तुंग षटकारांच्या मदतीने शानदार खेळी केली.
चालू बिग बॅश लीगमध्ये डेव्हिड वॉर्नर जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सिडनी सिक्सर्स विरुद्धच्या सामन्यात त्याने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला आणि गोलंदाजांचा समाचार घेतला. वॉर्नरने पहिल्या विकेटसाठी मॅथ्यू गिल्क्ससोबत 56 धावांची भागीदारी केली. त्यानंतर सिडनी थंडरने काही विकेट्स लवकर गमावल्या, पण वॉर्नरने एक बाजू लावून धरली. त्याने या मोसमातील दुसरे आणि स्पर्धेतील एकूण तिसरे शतक साजरे केले. 65 चेंडूंमध्ये 169 च्या स्ट्राईक रेटने त्याने नाबाद 110 धावा कुटल्या.
या शतकासह डेव्हिड वॉर्नरच्या नावावर आता टी-20 क्रिकेटमध्ये एकूण 10 शतके जमा झाली आहेत. यासह त्याने विराट कोहलीला मागे टाकले आहे, ज्याच्या नावावर 9 टी-20 शतके आहेत. आता या यादीत वॉर्नरच्या पुढे फक्त बाबर आझम (11 शतके) आणि ख्रिस गेल (22 शतके) हे दोनच खेळाडू आहेत.
या शतकी खेळीदरम्यान वॉर्नरने टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या 14,000 धावा देखील पूर्ण केल्या आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये हा टप्पा गाठणारा तो जगातील केवळ तिसरा फलंदाज ठरला आहे.