Ichalkaranji Result : वस्त्रनगरीत आवाडे–हाळवणकर गटाची एकजूट ठरली निर्णायक; शिव-शाहू आघाडीच्या दिग्गजांना धक्का
esakal January 17, 2026 02:45 PM

इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीत (Ichalkaranji Election Result 2026) भाजपने एकहाती सत्ता मिळविली. यात भाजपमधील आवाडे-हाळवणकर गटाची एकजूट महत्त्वाची ठरली. भाजपच्या अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे नाराजीची लाट होती; पण वेळीच नाराजी दूर करण्यात यश मिळाले. त्याचा फायदा भाजपच्या उमेदवारांना झाल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

अनेक प्रस्थापित चेहऱ्यांना दिलेली उमेदवारी ही भाजपच्या पथ्यावर पडली. विरोधी शिव-शाहू विकास आघाडीने सुरुवातीला जोरदार हवा निर्माण केली होती; पण ही हवा आघाडीला शेवटपर्यंत टिकविता आली नाही. भाजपच्या शेवटच्या टप्प्यातील रणनीतीमुळे या आघाडीला मर्यादित यश मिळाले. विशेष म्हणजे आघाडीच्या अनेक दिग्गजांचा झालेला पराभव धक्कादायक मानला जात आहे.

महापालिकेतील सत्ता खेचण्यासाठी भाजप आणि महाविकास आघाडीप्रणित शिव-शाहू विकास आघाडी यांच्यात रस्सीखेच होती. या निवडणुकीत भाजपमध्ये आवाडे-हाळवणकर गटाची ताकद एकत्रित असल्यामुळे विरोधकांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. तत्पूर्वी, जागा वाटपाच्या वादामुळे या आघाडीतून शिवसेनेने (ठाकरे गट) बाहेर पडून स्वबळावर निवडणूक लढवली, पण आघाडीकडे काही प्रभागांत प्रभावी चेहरे होते.

त्या जोरावर भाजप महायुतीला जेरीस आणण्याची रणनीती आघाडीकडून आखली; पण अपवाद वगळता बहुतांश प्रभावी चेहऱ्यांचा पराभव झाला. समोरच्या उमेदवारांना गांभीर्याने न घेणे, अतिआत्मविश्वास, प्रचारातील विस्कळीतपणा या चुका त्यांना महागात पडल्याचे निकालानंतर स्पष्ट झाले.

भाजपने बहुतांश प्रभागात प्रस्थापित चेहऱ्यांना संधी दिली होती. हा निर्णय भाजपच्या विजयाला कारणीभूत ठरला. भाजपमधील नाराजीचा फायदा उठविण्याच्या विरोधकांचे मनसुबे धुळीस मिळाले. अगदी एक-दोन नाराज झालेले कार्यकर्ते शिव-शाहू आघाडीच्या गळाला लागले, पण त्यांचा फारसा प्रभाव निवडणुकीत जाणवला नाही.

शिव-शाहू विकास आघाडीच्या नेतृत्वाखाली विरोधकांची मोट बांधण्यात यश आले, पण तुलनेने मजबूत असलेल्या भाजपशी टक्कर देताना आघाडीची दमछाक झाल्याचे दिसून आले. आघाडीकडून माजी मंत्री सतेज पाटील वगळता राज्य पातळीवरील एकही प्रभावी नेता प्रचाराला आलेला नाही. त्यामुळे शक्तिप्रदर्शन करत मतदारांवर अपेक्षित छाप पाडता आलेली नाही. तुलनेने भाजप-महायुती उमेदवारांच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांसह तीन मंत्री प्रचारात उतरले होते.

Ichalkaranji Result 2026 Won Candidate List : इचलकरंजीत भाजपचा बोलबाला की धक्का? चुरशीच्या लढतीनंतर महापालिकेत सत्ता कुणाची? वाचा विजयी उमेदवारांची यादी

भाजपकडून पॅनेल टू पॅनेलवर प्रचार करण्याबाबत दक्षता घेतली. त्यामुळे क्राॅस व्होटिंगचा धोका अनेक प्रभागांत टळला. तुलनेने शिव-शाहू आघाडीत मात्र तसे बऱ्याच प्रभागात कोणतेच नियोजन दिसत नव्हते. स्थानिक पातळीवर आमदार राहुल आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर व प्रकाश आवाडे यांनी पदयात्रा, कॉर्नरसभा यातून मतदारांसमोर भूमिका मांडली होती.

शिव-शाहू विकास आघाडीकडून पाणीप्रश्न प्रचाराचा केंद्रबिंदू होता, पण हा प्रश्न खोडून काढण्यात भाजपच्या नेतेमंडळींना यश आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या रोड शोवेळी त्यांनी पाणीप्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत असल्याचे सांगत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेतली. त्यामुळे हा प्रश्न लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीही निष्प्रभ ठरला, पण भाजपशी एकाकी दिलेली लढत दुर्लक्षित करून चालणार नाही.

लोकसहभागातून अपक्षांना बळ

इचलकरंजी महापालिका निवडणुकीत काही अपक्ष उमेदवारांना स्थानिक प्रभागातील नागरिकांनी आर्थिक मदत गोळा करून दिल्याचे चित्र पाहायला मिळाले. मोठ्या पक्षांच्या आर्थिक ताकदीसमोर अपक्ष उमेदवारांची मर्यादा लक्षात घेत आपल्या कुवतीप्रमाणे आर्थिक तर अनेकांनी प्रचार साहित्य, बॅनर, वाहन व्यवस्था अशा स्वरूपात मदत केली होती.

दृष्टिक्षेपात
  • वस्त्रनगरीत भाजपचा प्रभाव वाढला

  • प्रस्थापितांना दिलेली उमेदवारी भाजपच्या पथ्यावर

  • आवाडे-हाळवणकर गटाच्या एकजुटीवर शिक्कामोर्तब

  • शिव-शाहू आघाडीच्या दिग्गजांचा पराभव धक्कादायक

  • भाजपमधील नाराजावरील मदार आघाडीला भोवली

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.