पुणे - प्रत्येक फेऱ्यानंतर उमेदवारांच्या मतांमध्ये होणारा चढ-उतार, मतमोजणी करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर जाणवणारा तणाव... ३-४ फेऱ्यानंतर उमेदवाराने प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा मताधिक्य घेतल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये निर्माण होणारा आनंद... हळूहळू निकालाचे चित्र पूर्ण झाल्याचे स्पष्ट होताच मतमोजणी केंद्रासह बाहेर थांबलेल्या शेकडो कार्यकर्त्यांनी सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या भाजपपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांनीही पक्षाचे ध्वज फडकावत, फुले, गुलालाची उधळण करत आणि एकमेकांना पेढे भरवीत आनंद साजरा केला. भाजपने जागांची शंभरी पार करताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत आणि उमेदवार, पक्षाच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण शहर अक्षरशः दणाणून सोडले.
महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान झाल्यानंतर निवडणुकीत उतरलेल्या शेकडो उमेदवार, त्यांच्या कार्यकर्त्याचे डोळे शुक्रवारी होणाऱ्या निकालाकडे लागले होते. मतमोजणीच्या वेळी नेमके काय करायचे, याचे धडे गिरवत कार्यकर्ते शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच मतमोजणी केंद्रांवर पोहोचले.
हातात पॅड, पेन, कागद अशा पुरेशा तयारीनिशी गेलेल्या कार्यकर्त्यांनी मतमोजणीला सुरुवात होताच, आपल्या उमेदवाराची व प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या मतांची बेरीज करण्यास सुरुवात केली. टपालातील मते, पहिली फेरी, दुसरी फेरी अशा एक एक फेऱ्या पुढे सरकत असतानाच कार्यकर्त्यांची मतांचे गणित जुळविताना तारांबळ उडत होती.
अखेर, तिसऱ्या-चौथ्या फेरीला आपला उमेदवाराने चांगले मताधिक्य मिळविल्याचे लक्षात येताच, मतमोजणी कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्रांमध्येच जोरदार आरोळ्या ठोकल्या. क्षणार्धात बाहेर थांबलेल्या कुटुंबीयांना, शेकडो कार्यकर्त्यांना संदेश गेला.
त्यानंतर गुलालाची उधळण करत, उमेदवार, पक्षाच्या नावाने घोषणा देत, हातात पक्षाचे ध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तर दुसरीकडे कुटुंबीयांनी कित्येक किलो पेढे आणून आपल्या प्रभागातील नागरिकांना, मतदारांना पाठवीत त्यांच्याबरोबर आनंद साजरा केला. काही ठिकाणी पक्षाचे पूर्ण पॅनेल, तर काही ठिकाणी निम्मे पॅनेल आल्यानंतरही जल्लोष तसूभरही कमी झाला नाही.
मिरवणुकीद्वारे मतदारांबद्दल व्यक्त केली कृतज्ञता
दरम्यान, काही उमेदवारांनी आपल्या प्रभागात विजयी फेरी काढत मतदारांना अभिवादन करण्यास प्राधान्य दिले. उमेदवारांच्या हस्ते आपापल्या परिसरातील दैवतांची आरती करण्यात आली. तर काही उमेदवारांनी प्रभागातील, पक्षातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा आशीर्वाद घेण्यास प्राधान्य दिले. बहुतांश प्रभागामध्ये उमेदवारांची विजयी मिरवणूक निघाली.
त्यामध्ये कार्यकर्त्यांसह प्रभागामधील नागरिकांनीही उत्साहाने सहभाग घेतला. मिरवणुकीमध्ये तरुण कार्यकर्त्यांसह महिला, तरुणींची संख्या लक्षणीय होती. महिला-तरुणींनीही मिरवणुकीमध्ये ढोल-ताशा, डीजेच्या तालावर नृत्य करत आनंद साजरा केला. सर्वाधिक जागा घेणाऱ्या भाजप, त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, काँग्रेस, शिवसेनेच्या विजयी उमेदवारांच्या घरासमोरही मोठ्या प्रमाणात विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला.
ढोल-ताशा, डीजेच्या दणदणाटात
दरम्यान, काही मिनिटांतच मतमोजणी केंद्रांपासून काही अंतरावर फटाक्यांची आतषबाजी होऊ लागली. कुठे ढोल-ताशा, तर कुठे डीजेचा दणदणाट सुरू झाला. डीजेच्या तालावर कार्यकर्ते आनंदात नाचू लागले. विजय मिळविणाऱ्यांमध्ये सर्वाधिक भाजपचे उमेदवार असले, तरीही अनेक ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेच्या उमेदवारांनीही बाजी मारली.
त्यामुळे सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या उत्साहात भर पडली. या वेळी विजयी उमेदवारांच्या घराभोवती गुलालाची मुक्तहस्ते उधळण करतानाच पेढे भरवून विजयाचा आनंद साजरा करण्यात येऊ लागला. विजयी उमेदवार घरी पोहोचताच त्यांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. खुल्या जीप, घोड्यांवरून विजयी उमेदवारांची मिरवणूक काढण्यात आली. तर काही कार्यकर्त्यांनी दुचाकी रॅली काढत विजयी वातावरणात भर घातली.
शहरातीलच्या मध्यवर्ती भागातील प्रमुख रस्ते, बाजारपेठांसह उपनगरांमध्ये विजयी उमेदवारांचे फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. काही ठिकाणी विजयी रॅलीही काढण्यात आली. तासाभरातच शहरभर विजयी उमेदवारांचे फ्लेक्स लागले, तर पराजित झालेल्या उमेदवारांनी समाजमाध्यमांद्वारे मतदारांचे आभार मानण्यास प्राधान्य दिले.
पक्ष कार्यालयांमध्येही आनंदी वातावरण
भाजपच्या उमेदवारांनी मोठ्या संख्येने विजय मिळविल्याने पक्षाच्या डीपी रस्त्यावरील कार्यालयात मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला. गुलालची उधळण करत, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवीत आनंद साजरा केला. अनेक उमेदवारांनी विजयानंतर पक्ष कार्यालयास भेट दिली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांसमवेत आपला विजय साजरा करण्यास त्यांनी प्राधान्य दिले.
विजयानंतर उमेदवारांनी काढल्या मिरवणुका
निकालानंतर विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी त्यांच्या हिंगणे, वडगाव बुद्रुक, सनसिटी या भागातून विजयी मिरवणुका काढल्या. यामध्ये फुलांनी सजवलेल्या मोटारीमध्ये उमेदवार, कायकर्ते मोठ्या उत्साहाने मतदारांना निवडून दिल्याबद्दल हात जोडून धन्यवाद देत होते. तसेच, काही अंतरावर फटाक्यांच्या माळा लावल्या जात होत्या. काही ठिकाणी तर दुचाकी रॅली काढण्यात आली. तसेच, काहींनी तर डीजे चा ‘आवाज’ वाढवत जल्लोष केला.
रखडलेले निकाल अन् ताटकळलेले कार्यकर्ते
उमेदवारांच्या आक्षेपांमुळे अनेक प्रभागांतील निकाल लागण्यास उशीर होत होता. याचा फटका कार्यकर्त्यांना बसला. एकावेळी एका प्रभागाची मतमोजणी होत असल्याने सर्वात शेवटच्या प्रभागाची मतमोजणी सुरू होण्यास काही ठिकाणी रात्रीचे आठही वाजले. सकाळपासून उत्साहाने आलेल्या कार्यकर्त्यांमध्ये त्यामुळे काहीशी मरगळ आली होती. मतदान केंद्राबाहेर ताटकळत असलेल्या कार्यकर्त्यांचा या रखडलेल्या निकालाने हिरमोड झाला.
मतमोजणी केंद्राबाहेर गुलालच गुलाल
सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या मतमोजणी केंद्रामधून निवडणूक निर्णय अधिकारी हे फेरीनिहाय मतमोजणीची आकडेवारी जाहीर करत असताना आघाडीवर असलेल्या उमेदवारांचे कार्यकर्ते जल्लोष करत होते. दुपारनंतर निकाल स्पष्ट होऊ लागल्यावर विजयी उमेदवारांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारू लागला.
त्यांनी मतमोजणी केंद्राच्या बाहेरील रस्त्यावर गुलाल उधळून आनंद व्यक्त केला. पोते भरून गुलाल उधळला जात होता अन् उमेदवारांना खांद्यावर उचलून जल्लोष केला जात होता. त्यामुळे रस्त्यावर गुलालाचा खच पडला होता. सगळेच कार्यकर्ते या गुलालात न्हाऊन निघाले होते.
‘वडापाव’ने तारले
निकालासाठी दिवसभर मतदान केंद्रावर ठाण मांडून बसलेल्या कार्यकर्त्यांची भूक शमवण्याचा सर्वोत्तम पदार्थ म्हणजे वडापाव. आपल्या उमेदवाराचे निकाल जाहीर होईपर्यंत वाट पाहत थांबलेल्या कार्यकर्त्यांना या वडापावनेच आधार दिला. अनेकांनी त्यावरच सगळा दिवस काढला.