चाकणला सांडपाणी वाहिनीची कामे प्रलंबित
esakal January 17, 2026 02:45 PM

चाकण, ता. १६ : पुणे-नाशिक महामार्गावर, तळेगाव-चाकण-शिक्रापूर मार्गावर सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहे. अद्यापही ते पूर्ण झालेले नाही. अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहे. सांडपाणी वाहिनीवर काही ठिकाणी चेंबर न टाकल्यामुळे वाहिनी खुल्या आहेत त्यात काही जण पडत आहेत त्यामुळे अपघात वाढले आहेत.
चाकण (ता. खेड) येथील नव्याने काम करण्यात आलेल्या सांडपाणी वाहिनीवर योग्य भराव किंवा संरक्षक व्यवस्था करण्यात आलेली नाही त्यामुळे अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालक व पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर ही भयानक अवस्था आहे. रहिवासी भागातील तसेच वर्दळीच्या मार्गावर तळेगाव चौकात सांडपाणी वाहिनीचे काम अर्धवट अवस्थेत आहे. काही ठिकाणी खोल खड्डे उघडेच आहेत त्या ठिकाणी संरक्षक बॅरिकेड्स लावण्यात आलेले नाहीत. संबंधित ठेकेदार व प्रशासनाकडून कामाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रलंबित कामांमुळे अपघाताचाच धोका निर्माण झाला नाही तर धूळ व घाणीची समस्या निर्माण झाली असल्यामुळे आरोग्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.
संबंधित ठेकेदार कंपनीने तसेच राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय)या कामाकडे गांभीर्याने लक्ष देऊन सांडपाणी वाहिनीचे काम तातडीने पूर्ण करावे तसेच ज्या ठिकाणी काम अर्धवट आहे त्या ठिकाणी बॅरिकेड्स, सूचना फलक व रात्रीच्या वेळी दिव्यांची सोय करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. याबाबत राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होऊ शकला नाही.

0010

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.