रशियाच्या लढाऊ विमानावर विचार : 114 राफेल खरेदीवर मोहोर तरीही पर्याय खुले
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्सकडून 114 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकल्यावरही रशियाच्या सुखोई-57 लढाऊ विमानाला स्वत:च्या ताफ्यात सामील करण्याचा पर्याय अद्याप खुला आहे. राफेल प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याचा अर्थ सुखोई-57 वरून विचार संपुष्टात आला असा नाही. सरकार या पर्यायावर अद्याप मंथन करत असल्याचे संरक्षण मंत्रालयाशी निगडित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. राफेल आणि सुखोई-57 ची भूमिका आणि उद्देश वेगवेगळे आहेत. राफेल एक अत्याधुनिक 4.5 पिढीचे बहुउद्देशीय लढाऊ विमान असून ते भारतीय वायुदलाच्या घटत्या स्क्वाड्रन संख्येला वेगाने पूर्ण करणे आणि तात्कालिक संचालन गरजांसाठी निवडले जात आहे. याच्या उलट सुखोई-57 पाचव्या पिढीचे स्टील्थ लढाऊ विमान असून ते भविष्याच्या उच्चतीव्रतेच्या संघर्षाला लक्षात घेत विकसित करण्यात आले आहे.
वायुदलाकडे सध्या लढाऊ विमानांच्या केवळ 29 स्क्वाड्रन्स आहेत. तर दुहेरी युद्धाचे आव्हान पाहता वायुदलाला 42 स्क्वाड्रन्सची आवश्यकता असल्याचे मानले जाते. राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीचा व्यवहार हा तत्काळ संकटावर मात करण्यासाठी पुढे रेटण्यात आला आहे. पूर्वीपासून राफेल लढाऊ विमान भारतीय वायुदलाच्या ताफ्यात कार्यरत असल्याच्या याच्या इंडक्शनची प्रक्रिया तुलनेत अधिक वेगवान असू शकते. सुखोई-57 ला दीर्घकालीन रणनीतिक तयारीच्या दृष्टीकोनातून उपयुक्त मानले जातेय. अशास्थितीत भारत मर्यादित संख्येत सुखोई-57 च्या काही स्क्वाड्रन्स सामील करण्याचा विचार करू शकतो.
क्षमतांमध्ये फरक
राफेल स्वत:ची बहुउद्देशीय क्षमता, विश्वसनीय एवियोनिक्स, आधुनिक इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर आणि अचूक शस्त्रास्त्र प्रणालींसाठी ओळखले जाते. हे लढाऊ विमान आकाशातून आकाशात, आकाशातून जमिनीवर आणि आण्विक डिलिव्हरी यासारख्या अनेक भूमिका पार पाडण्यास सक्षम आहे, यामुळे सद्यस्थितीत ते अत्यंत प्रभावी ठरते. तर सुखोई-57 स्वत:च्या विशिष्ट पाचव्या पिढीच्या क्षमतांमुळे महत्त्वपूर्ण मानले जात आहे. स्टील्थ डिझाइन, सुपरक्रूज क्षमता, अत्याधुनिक सेंसर फ्यूजन, नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेयर आणि एआय आधारित प्रणालींनी युक्त हे विमान शत्रूच्या हवाई सुरक्षा नेटवर्कमध्ये खोलवर शिरुन हल्ला करणे आणि ट्रॅक न होता परतण्याची क्षमता राखून आहे. चीनसारख्या देशांकडून पाचव्या पिढीच्या स्टील्थ विमानांकडून तैनात करण्यात आली असल्याने या क्षमतांना सामरिक संतुलनासाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.
114 राफेल लवकर उपलब्ध व्हावेत
सामरिक आवश्यकता पाहता 114 राफेल लढाऊ विमानांचा व्यवहार लवकर पूर्ण होण्याची गरज आहे. तसेच रशियाकडून सुखोई-57 च्या काही स्क्वाड्रन्स प्राप्त करण्यावरही विचार होऊ शकतो. भारताच्या स्वदेशी पाचव्या पिढीच्या अॅडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट कार्यक्रमाला विचारात घेत सुखोई-57 ची देशात निर्मिती केली जाऊ नये असे सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे माजी महासंचालक एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी म्हटले आहे.