ICC T-20 WC 2026 – हिंदुस्थानातच सामने खेळा, अन्यथा बाहेर पडा! ICC चा बांगलादेशला अल्टिमेटम
Marathi January 19, 2026 03:25 PM

ICC ने बांगलादेशी संघाबाबत कठेर भूमिका घेतली आहे. राजकीय तणाव आणि सुरक्षेच्या कारणास्तलव हिंदुस्थानातील आमच्या संघाचे सामने श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी मागणी बागंलादेश क्रिकेट बोर्डाने ICC कडे केली होती. त्यावर ICC ने हिंदुस्थानातील कोणतेही ठिकाण सामन्यांसाठी निवडा, असा पर्याय ICC ने बांगलादेशला दिला होता. या सर्व घडामोडींमुळे विश्वचषकातील बांगलादेशच्या समान्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता ICC ने कठोर भूमिका घेत हिंदुस्थानातच सामने खेळा, अन्यथा बाहेर पडा, असा अल्टिमेटम बांगलादेशला दिला आहे.

बांगलादेश क्रिकेट बोर्डाला (बीसीबी) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) कडक अल्टिमेटम देण्यात आला आहे. आयसीसीने बीसीबीला स्पष्ट केले आहे की येत्या टी 20 विश्वचषकात बांगलादेशच्या सहभागाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 21 जानेवारी ही अंतिम तारीख असेल. त्यामुळे २०२६ च्या टी -20 विश्वचषकावरून आयसीसी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) यांच्यातील तणाव वाढला आहे.

आयसीसी शिष्टमंडळाची शनिवारी ढाका येथे दुसरी बैठक झाली. बीसीबीने २०२६ चा टी २० विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, हिंदुस्थानात खेळण्यास नकार दिला. सुरक्षेच्या कारणास्तव बांगलादेशने पर्यायी ठिकाणाची मागणी केली आणि संभाव्य पर्याय म्हणून सहयजमान असलेल्या श्रीलंकेत खेळण्याची प्रस्ताव ठेवला. मात्र, आयसीसीने त्यांच्या मूळ भूमिकेवर ठाम राहत वेळापत्रक कायम ठेवले. तसेच विश्वचषकात खेळायचे असेल तर गट क मध्ये असलेल्या बांगलादेशला मुंबई आणि कोलकाता येथे त्यांचे सामने खेळावे लागले.

बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्सना त्यांच्या संघातून मुस्तफिजूर रहमानला मुक्त करण्याचे निर्देश दिले तेव्हापासून या तणावाला सुरुवात झाली. बीसीबीने आयसीसीला पत्र लिहून सांगितले की ते हिंदुस्थानात विश्वचषक सामने खेळण्यास तयार नाहीत आणि जर त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर स्पर्धेतून माघार घेऊ शकतात. हा मुद्दा पहिल्यांदा ४ जानेवारी रोजी उपस्थित करण्यात आला होता. आयसीसीने आयर्लंडसोबतच्या त्यांच्या संघाच्या गटात बदल करण्याची बांगलादेशची मागणी फेटाळली. आयर्लंडचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत. आयसीसीने बीसीबीला असेही आश्वासन दिले की हिंदुस्थानात त्यांच्या संघाच्या सुरक्षेला कोणताही धोका नाही.

आयसीसी सध्या २१ जानेवारीपर्यंत बीसीबीच्या निर्णयाची वाट पाहत आहे. मात्र, बांगलादेश स्पर्धेत सहभागी झाला नाही, तर आयसीसी सध्याच्या क्रमवारीनुसार एका बदली संघाचा समावेश करेल. त्यामुळे स्कॉटलंड संघाला याचा फायदा होऊ शकतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.