खावडा, रिलायन्स, अदानीसारख्या मोठ्या कंपन्यांच्या हायटेंशन लाइनच्या वाटेत येणाऱ्या झाडांची पालघरमध्ये खुलेआम कत्तल होत आहे. मात्र पोटासाठी स्वतःच्या मालकीच्या जागेतील झाडोरा तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आदिवासींच्या वाटेत वनविभाग मात्र नियमांचे काटे टाकत आहे. त्यामुळे जव्हारसह अनेक तालुक्यांतील आदिवासींची आर्थिक कोंडी होत असून जव्हार वनविभागाच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त होत आहे. बेभरवशी पावसामुळे लागोपाठ दुसऱ्या वर्षी पालघर जिल्ह्यातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. नापिकीने केलेला खर्चदेखील निघालेला नाही. अशातच आता स्वतःच्या शेतातील लाकूडफाटा तोडून पोट भरण्याचा प्रयत्न करणाऱ्या येथील आदिवासींना नियम दाखवून कारवाईची धमकी देत आहेत. उपवनसंरक्षक डॉ. सैफून शेख यांच्या मनमानी व भ्रष्ट कारभारामुळे येथील आदिवासी व शेतकरी नडला जात असल्याचा गंभीर आरोप कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केला असून याविरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोणतीही परवानगी न घेता सुरू आहेत कामे
उपवनसंरक्षक डॉ. शेख हे नियमांचा बागूलबुवा उभा करून शेतकऱ्यांना झाडोरा तोडण्याला परवानगी नाकारतात मात्र त्याचवेळी खावडा, रिलायन्स, अदानीसारख्या मोठ्या कंपन्यांना जव्हार, मोखाडा, विक्रमगड व वाडा तालुक्यात टॉवर लाईन टाकण्याकरिता तातडीने परवानग्या दिल्या जात आहेत. या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व उत्खनन सुरू केले असून वनविभागाच्या आशीर्वादाने स्थानिक आदिवासींच्या जमिनींवर कोणतीही पूर्वसूचना न देता जबरदस्तीने काम केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे








