भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिकेनंतर आता टी 20I मालिकेचा थरार रंगणार आहे. उभयसंघात एकूण 5 टी 20I सामने खेळवण्यात येणार आहेत. या मालिकेतील सामने हे 21 ते 31 जानेवारी दरम्यान पार पडणार आहेत. आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेआधी दोन्ही संघांची ही शेवटची मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा वर्ल्ड कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या मालिकेतून जोरदार तयारी करण्याचा प्रयत्न असणार आहे. मालिकेतील पहिला सामना हा नागपूरमध्ये होणार आहे. मात्र त्याआधी मोठी बातमी समोर आली आहे. टी 20I मालिकेतील पहिल्या सामन्याआधी टीममध्ये अचानक एका खेळाडूची एन्ट्री झाली आहे.
टी 20I मालिकेसाठी पाहुण्या न्यूझीलंड क्रिकेट संघात एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेतून पदार्पण करणाऱ्या क्रिस्टियन क्लार्क याला पहिल्या 3 टी 20I सामन्यासाठी संघात संधी देण्यात आली आहे. न्यूझीलंडचा स्टार ऑलराउंडर मायकल ब्रेसवेल याला दुखापत झाली आहे. ब्रेसवेल दुखापतीनंतरही संघात कायम आहे. मात्र ब्रेसवेल याला दुखापतीमुळे पहिल्या सामन्यात खेळता येणार की नाही? हे निश्चित नाही. त्यामुळे टीम मॅनेजमेंटने संभाव्य धोका पाहता खबरदारी म्हणून क्लार्कचा संघात समावेश केला आहे.
मायकल ब्रेसवेल याला टीम इंडिया विरूद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यादरम्यान डाव्या पोटरीला दुखापत झाली होती. उभयसंघातील तिसरा सामना इंदूरमधील होळकर स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. ब्रेसवेलला या दुखापतीमुळे उर्वरित सामन्यात खेळता आलं नाही.
न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने काय सांगितलं?
क्लार्कने टीम इंडिया विरूद्धच्या एकदिवसीय पदार्पणातील मालिकेत आपली छाप सोडली. क्लार्कला त्याच्या एकदिवसीय मालिकेतील कामगिरीच्या जोरावरच पहिल्या 3 टी20I सामन्यांसाठी संधी देण्यात आली आहे. क्लार्कने 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण 7 विकेट्स मिळवल्या होत्या. त्यामुळे आता क्लार्कला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया विरूद्धच्या टी 20i मालिकेसाठी न्यूझीलंडचा सुधारित संघ : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकल ब्रेसवेल, मार्क चॅपमॅन, क्रिस्टियन क्लार्क (पहिल्या 3 सामन्यांसाठी), डेवोन कॉनव्हे, जेकब डफी, झॅक फाउल्केस, मॅट हेन्री, कायल जेमीसन, बेवोन जेकब्स, डॅरेल मिचेल, जेम्स निशम, ग्लेन फिलिप्स, रचीन रवींद्र, टीम रॉबिन्सन आणि ईश सोढी.