WPL 2026: शिस्तबद्ध राहा…! हार्दिक पांड्या आरसीबीच्या खेळाडूला असं का म्हणाला?
GH News January 20, 2026 08:11 PM

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर अंतिम फेरी आणि एलिमिनेटर संघाचं गणित बदलत आहे. पण आरसीबीचा संघ आता निर्धास्त आहे. कारण सलग पाच सामन्यात विजय मिळवून बाद फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. आता एका सामन्यात विजय मिळवला की थेट अंतिम फेरीत खेळणार आहे. आरसीबीच्या पाचव्या विजयात गौतमी नाईकचा मोलचा वाटा राहीला. गुजरात जायंट्सविरुद्ध आरसीबीने 61 धावांनी विजय मिळवला. कारण विजयी धावांचं आव्हान देताना गौतमी नाईकने जबरदस्त खेळी केली. तिने 55 चेंडूत 73 धावांची खेळी केली. आरसीबी अडचणीत असताना तिने आक्रमक खेळी करत संघाला सावरलं. तिच्या खेळीमुळे आरसीबीने 6 गडी गमवून 178 धावा केल्या आणि विजयासाठी 179 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान गुजरात जायंट्सला काही गाठता आलं नाही. गुजरातने 20 षटकात 8 गडी गमवून 117 धावा केल्या. या विजयाची शिल्पकार गौतमी नाईक ठरली. तिने सामन्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच हार्दिक पांड्या आदर्श असल्याचं सांगितलं.

आरसीबीची फलंदाज गौतमी नाईकने सांगितलं की, दबावात असताना हार्दिक पांड्यासारखं निर्धास्त चांगली कामगिरी करायची आहे. वुमन्स प्रीमियर लीगने त्यांच्या सोशल मिडिया खात्यावर गौतमी नाईकचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात ती म्हणाली की, ‘हार्दिक पांड्या माझे आदर्श आहेत. मी त्यांची कॉपी करते. मला त्याच्यासारखं खेळायचं आहे. त्याचा खेळ, दबावात शांतपणे खेळण्याची पद्धत.. हे सर्व माझ्या स्वभावासारखंच आहे. मला त्याच्यासारखंच खेळायचं आहे.’ तिच्या विधानानंतर हार्दिक पांड्याने तिला खास मेसेज पाठवला आहे.

हार्दिक पांड्या म्हणाला, ‘नमस्कार गौतमी.. तू मला आदर्श मानते हे मी ऐकलं. मला खूप छान वाटलं की मी खेळाडूंना प्रेरणा देऊ शकलो. तुझ्या पहिल्या अर्धशतकासाठी अभिनंदन.. खेळाचा आनंद घे. मला आशा आहे तू भविष्यात तुझ्या फ्रेंचायझीला आणि देशाला आणखी गौरव मिळवून देशील. खेळावर प्रेम करत राहा आणि शिस्तबद्ध राहा. आनंद घे.’

गौतमी नाईक 27 वर्षांची असून तिने 2013 मध्ये क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. महाविद्यालयात पुरूष संघात एका खेळाडूची कमतरता असताना तिला खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर प्रशिक्षक अविनाश शिंदे यांनी तिचं करिअर घडवण्यास मदत केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.