शुबमन गिल त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाला 2026 मधील पहिल्या एकदिवसीय मालिकेत विजयी करण्यात अपयशी ठरला. भारताला न्यूझीलंड विरूद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेत 1-2 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं. त्यानंतर आता टीम इंडिया सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात एकूण 5 सामन्यांची टी 20i मालिका खेळणार आहे. पहिल्या सामन्याचा थरार हा 21 जानेवारीला नागपूरमध्ये रंगणार आहे. भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने या पहिल्या सामन्यासाठी मोठा त्याग केला आहे. कर्णधार सूर्याने सामन्याच्या पूर्वसंध्येला (20 जानेवारी) झालेल्या पत्रकार परिषदेत नक्की काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्या टी 20i सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तर दिलं. सूर्याने यादरम्यान प्लेइंग ईलेव्हनबाबतही भाष्य केलं. सूर्याने सलामीच्या सामन्यात तिलक वर्मा याच्या जागी इशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांपैकी कोण खेळणार? हे स्पष्ट केलं. सूर्याने तिलकच्या जागी टीम इंडियाचा युवा विकेटकीपर फलंदाज इशान किशन पहिल्या सामन्यात खेळणार असल्याचं जाहीर केलं. सोबतच इशान कोणत्या स्थानी खेळणार हे देखील स्पष्ट केलंय.
रेव्ह स्पोर्ट्सनुसार, इशान किशन तिसऱ्या स्थानी खेळणार असल्याचं सूर्याने सांगितलं आहे. सूर्याने अशाप्रकारे इशानसाठी आपली जागा सोडत मनाचा मोठेपणा दाखवला आहे. सूर्या टी 20i क्रिकेटमध्ये तिसऱ्या स्थानी खेळतो. मात्र आता इशान त्याच्या जागी खेळताना दिसणार आहे. त्यामुळे इशान आता तिसऱ्या स्थानी खेळताना कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
भारताचा मिडल ऑर्डरमधील प्रमुख फलंदाज तिलक वर्मा याला दुखापतीमुळे न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या 3 टी 20i सामन्यांना मुकावं लागलं आहे. त्यामुळे तिलकच्या जागी संघात श्रेयस अय्यर याचा समावेश करण्यात आलाय. त्यामुळे प्लेइंग ईलेव्हनमध्ये श्रेयस आणि इशान या दोघांपैकी कुणाला संधी मिळणार? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष होतं. मात्र कर्णधार सूर्याने इशान प्लेइंग ईलेव्हनमध्ये खेळणार असल्याचं जाहीर केलं.
इशानच्या कमबॅकमुळे सूर्याला आपलं स्थान सोडावं लागलंय. त्यामुळे सूर्या चौथ्या स्थानी खेळताना दिसणार आहे. तेच जर श्रेयसला संधी मिळाली असती तर सूर्या तिसऱ्याच स्थानी खेळला असता. कारण श्रेयस वनडे क्रिकेटमध्येही चौथ्या स्थानी खेळतो. सूर्याने अशाप्रकारे इशानसाठी आपल्या जागेचा त्याग करत मनाचा मोठेपणा दाखवला आहे.तर आता श्रेयसला प्लेइंग इलेव्हनसाठी दुसऱ्या सामन्यापर्यंत प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
इशानचं यासह तब्बल 2 वर्षांनतंर भारतीय टी 20i संघाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कमबॅक होणार असल्याचं निश्चित झालं आहे. इशानने त्याच्या टी 20i कारकीर्दीतील अखेरचा सामना हा 28 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळला होता.