टी20 वर्ल्डकप स्पर्धेतून बांगलादेशचा संघ आऊट! डेडलाईनपूर्वी घडलं असं काही
GH News January 20, 2026 09:14 PM

बांग्लादेशने आतापर्यंत एकही आयसीसी चषक जिंकलेला नाही. अनेकदा साखळी फेरीतच आव्हान संपुष्टात आलं आहे. फार फार तर एखाद्या वरिष्ठ संघाची पुढच्या फेरीची वाट बिकट केली आहे. असं असूनही बांगलादेशचा संघ आयसीसीच्या डोक्यावर बसून मिऱ्या वाटत आहे. टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारतात न खेळण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. भारतासोबत वाद असल्याचं सांगत सुरक्षेचा मुद्दा पुढे केला आहे. तसेच भारतात सामने आयोजित करण्याऐवजी श्रीलंकेत करण्याची मागणी केली आहे. पण आयसीसीने वेळापत्रक ठरल्याचं सांगत नकार दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळलं आहे. आता आयसीसीने बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला 21 जानेवारीपर्यंतची डेडलाईन दिली आहे. पण असं असूनही बांग्लादेश सरकार झुकण्यास तयार नाही. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार यांनी भारतात खेळणार नसल्याच स्पष्ट केलं आहे.

मुस्तफिझुर रहमानची आयपीएल स्पर्धेतून हकालपट्टी केल्याने बांग्लादेश क्रिकेट बोर्ड आणि सरकारचा संताप झाला आहे. तेव्हापासून या वादाला फोडणी मिळाली आहे. बांग्लादेश सरकारने या अपमानाचा सूड घेण्यासाठी क्रिकेट संघ भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. बांगलादेशला साखळी फेरीतील सर्व सामना भारतात खेळायचे आहे. पहिले तीन सामने कोलकात्यात, त्यानंतर शेवटचा साखळी फेरीतील सामना मुंबईत असणार आहे. मात्र बांगलादेशने भारतात खेळणारच नाही हे स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी आयसीसीचं शिष्टमंडळ बांगलादेशला गेलं होतं. ही बैठकही तोडग्याविना संपली.

आयसीसीने 21 जानेवारीपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आणखी काही तास बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या निर्णयाची वाट पाहिली जाईल. त्यानंतर बांग्लादेश झुकला नाही तर त्यांना स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. बांग्लादेश ऐवजी स्पर्धेत स्कॉटलँड संघाची नियुक्ती केली जाईल. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार नजरूल यांनी सांगितलं की, ‘स्कॉटलंडबद्दल माझ्याकडे कोणतीही माहिती नाही. जर भारतीय क्रिकेट बोर्डाच्या दबावाखाली आयसीसीने आमच्यावर अनावश्यक अटी लादल्या तर आम्ही ते स्वीकारणार नाही. सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानने यापूर्वी भारतात प्रवास करण्यास नकार दिला आहे आणि आयसीसीनेही ते मान्य केले आहे. आम्हीही अशीच मागणी करत आहोत’

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.