न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत सूर्यकुमारची अग्निपरीक्षा, जर तसं झालं नाही तर…
Tv9 Marathi January 20, 2026 11:46 PM

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वीची चाचणी परीक्षा टीम इंडिया देणार आहे. न्यूझीलंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेत टीम इंडियाला चुका आणि काही खेळाडूंना फॉर्म मिळवण्याची शेवटची संधी आहे. या मालिकेत खऱ्या अर्थाने टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचा कस लागणार आहे. कारण या मालिकेत जर त्याला फॉर्म गवसला नाही तर त्याचं पुढचं गणित खूपच कठीण असणार आहे. सूर्यकुमार यादव हा मैदानाच्या चोहूबाजूला फटके मारण्यात माहीर आहे. पण त्याची बॅट गेल्या वर्षभरापासून शांत आहे. त्यामुळे त्याचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरला आहे. खरं तर कर्णधार नसता तर त्याला कधीच बाहेर बसवलं असतं अशी स्थिती आहे. सूर्यकुमार यादवने शेवटचं अर्धशतक हे 15 महिन्यांपूर्वी झळकावलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत काहीच खास करू शकलेला नाही.

सूर्यकुमारच्या फलंदाजीला दोन वर्षात ग्रहण

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी सूर्यकुमार यादवला स्वत:ची परीक्षा घ्यावी लागणार आहे. कारण या पाच सामन्यात त्याला सिद्ध करण्याची संधी आहे. जर त्याला फॉर्म गवसला तर टीम इंडियासाठी बाकी काम करणं सोपं होईल. नाही तर हा वर्ल्डकप भारताला जिंकणं खूपच कठीण होईल. सूर्यकुमार यादवचा फॉर्म मागच्या 2 वर्षात पडला आहे. टी20 वर्ल्डकप 2024 स्पर्धेनंतर त्याच्या बॅटिंगला ग्रहण लागल्याचं दिसत आहे. सूर्यकुमार यादव वेगवान गोलंदाजीचा सामना करताना अडखळत असल्याचं आकडेवारीवरून दिसत आहे. वेगवान गोलंदाजीविरुद्ध त्याने 298 चेंडूंचा सामना केला आणि 29 वेळा बाद झाला. तर फिरकीचा सामना करताना 162 चेंडू खेळले आणि 3 वेळा बाद झाला.

सूर्यकुमार यादवने 2023 पर्यंत पहिल्या 10 चेंडूत वेगवान गोलंदाजीविरुद्ध 434 आणि फिरकीविरुद्ध 286 धावा केल्या आहेत. हीच आकडेवारी 2024 नंतर पहिल्या 10 चेंडूंत वेगवान गोलंदाजीविरुद्ध 235 धावा आणि फिरकीविरुद्ध 120 धावा आहेत. 2023 पर्यंत त्याचे आकडे आक्रमक खेळीचं दर्शन घडवत होते. पण आता त्याला गंज चढल्यासारखं दिसत आहे. आता नव्या वर्षात सूर्यकुमार यादव पहिल्यांदा न्यूझीलंडविरुद्ध टी20 मालिका खेळणार आहे. त्यामुळे त्याच्याकडून अपेक्षा वाढल्या आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.