अक्षय कुमार, आर. माधवन आणि अनन्या पांडे यांच्या मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 2025 मध्ये ऐतिहासिक घटनेवर आधारित सर्वांत यशस्वी चित्रपट ठरला होता. 18 एप्रिल 2025 रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. त्यानंतर तो जियो हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम झाला.
ताज्या रिपोर्ट्सनुसार, ‘केसरी: चाप्टर 2’ने जियो हॉटस्टारवर 18.1 दशलक्षांहून (1.8 कोटी) अधिक व्ह्यूज मिलवले आहेत. 2025 मधील हा सर्वाधिक पाहिला गेलेला ‘नॉन-नेटफ्लिक्स’ चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने फक्त चार आठवड्यांत हे साध्य केलं. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा एक विक्रमच आहे.
2019 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘केसरी’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. परंतु या चित्रपटाची कथा पूर्णपणे वेगळी आहे. 1919 मध्ये झालेल्या जालियनवाला बाग हत्याकांडानंतरच्या कायदेशीर लढाईला यात दाखवण्यात आलं आहे.
या चित्रपटात अक्षय कुमारने वकील सी. शंकरन नायरची भूमिका साकारली आहे, ज्यांनी ब्रिटीश साम्राज्याला कोर्टात आव्हान दिलं होतं. तर आर. माधवनने ब्रिटिश वकील नेविल मॅकिन्लेच्या भूमिकेतून अक्षयला चांगली ऑनस्क्रीन टक्कर दिली आहे. यामध्ये अनन्या पांडेनं एका दृढनिश्चयी कायद्याच्या विद्यार्थिनीची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाचं दिग्दर्शन करण सिंह त्यागी यांनी केलं असून त्यातील अचूक ऐतिहासिक तथ्ये आणि दमदार संवाद यांसाठी त्यांचं प्रेक्षक-समीक्षकांकडून कौतुक झालं होतं. यामध्ये अक्षय कुमारचा 20 मिनिटांचा मोनोलॉग प्रेक्षकांना भावूक करणारा ठरला. या दृश्यावर अनेकांना अश्रू अनावर झाले. या चित्रपटाला आयएमडीबीवर 10 पैकी 8.2 रोटिंग मिळाली आहे.