IND vs NZ, 1st T20I : सूर्यासेनेची नागपूरमध्ये बॅटिंग, चौघांचा पत्ता कट, न्यूझीलंड विरुद्ध किती धावा करणार?
GH News January 21, 2026 10:17 PM

टीम इंडिया विरूद्धच्या 5 सामन्यांच्या टी 20I मालिकेतील पहिल्या मॅचमध्ये पाहुण्या न्यूझीलंडच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनर याने विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या या स्टेडियममध्ये फिल्डिंगचा निर्णय घेत भारताला फलंदाजीची संधी दिली आहे. त्यामुळे आता टीम इंडिया या संधीचा फायदा घेत किती धावांपर्यंत मजल मारणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पहिल्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.

इशान किशनचं कमबॅक

विकेटकीपर बॅट्समन इशान किशन याचं टीम इंडियाच्या प्लेइंग ईलेव्हनमध्ये तब्बल 2 वर्षांनंतर कमबॅक झालं आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत इशानच्या कमबॅकची माहिती दिली होती.  तर कुलदीप यादव, हर्षित राणा, श्रेयस अय्यर आणि रवी बिश्नोई या चौघांचा प्लेइंग ईलेव्हनमध्ये समावेश नसल्याचंही सूर्याने टॉसनंतर स्पष्ट केलं. त्यामुळे या चौघांना संधीसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

हेड टु हेड रेकॉर्ड

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत एकूण 25 टी 20I सामने खेळवण्यात आले आहेत. भारताने त्यापैकी 14 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने 10 टी 20I सामने जिंकले आहेत. तर एका सामन्याचा निकाल लागला नाही.

तसेच भारताचा न्यूझीलंड विरुद्ध मायदेशातही दबदबा राहिला आहे. भारताने न्यूझीलंडला मायदेशात 11 पैकी 7 सामन्यांमध्ये पराभूत केलंय. तर न्यूझीलंडने टीम इंडियावर भारतातील 4 टी 20I सामन्यांमध्ये विजय मिळवलाय.

भारत-न्यूझीलंडची नागपूरमधील आकडेवारी

दरम्यान टीम इंडियाने आतापर्यंत नागपूरमधील या स्टेडियममध्ये 5 टी 20i सामने खेळले आहेत. भारताने त्यापैकी 3 सामने जिंकले आहेत. तर 2 सामन्यांत विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने या मैदानात खेळलेल्या एकमेव सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने भारतावर 2016 साली झालेल्या सामन्यात 47 धावांनी मात केली होती. त्यामुळे टीम इंडिया 10 वर्षांआधीच्या पराभवाची परतफेड करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

न्यूझीलंड टॉसचा बॉस

न्यूझीलंडचे अंतिम 11 शिलेदार : मिचेल सँटनर (कर्णधार), टीम रॉबिन्सन, डेव्हॉन कॉनव्हे (विकेटकीपर), रचीन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डॅरेल मिशेल, क्रिस्टियन क्लार्क, कायल जेमिसन, ईश सोढी आणि जेकब डफी.

भारताची प्लेइंग ईलेव्हन : सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, इशान किशन, रिंकू सिंग, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती आणि अर्शदीप सिंग.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.