टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने सुरु केलेल्या नाटकांना सणसणीत चपराक बसली आहे. बांगलादेशने भारतात टी20 वर्ल्डकप स्पर्धेचे सामने खेळणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. यासाठी आयसीसीकडे म्हणणं मांडलं होतं.इतकंच काय तर बांगलादेशचे सर्व सामने श्रीलंकेत भरवण्याची मागणी केली होती. आयर्लंडसोबत ग्रुप बदलण्याची तयारी दाखवली होती. पण या सर्व मागण्यांना आयसीसीने केराची टोपली दाखवली. आयसीसीने टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं वेळापत्रक आधीच ठरल्याचं सांगितलं. त्यामुळे सामने इतरत्र हलवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. इतकं सांगूनही बांग्लादेश आपल्या भूमिकेवर ठाम राहीलं. त्यांना पाकिस्तानची साथ मिळाली. पण या सर्वाची हवा आयसीसीने एका झटक्यात काढली. बांगलादेशच्या ठिकाण बदलण्याच्या मागणीसाठी आयसीसीने मतदान घेतलं. यात बांग्लादेश क्रिकेट बोर्ड 2-1 ने पराभूत झालं. बांग्लादेश आणि पाकिस्तान या दोघांनी त्यांच्या पारड्यात मत टाकलं.
जगभरातील क्रिकेट बोर्डांनी भारताच्या बाजूने कौल दिला. त्यामुळे टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या वेळापत्रकात काहीच बदल होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. यानंतर आयसीसीने आता कठोर निर्णय घेण्याची तयारी केली आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने येत्या 24 तासात निर्णय घ्यावा, अन्यथा दुसऱ्या संघाला जागा मिळेल हे स्पष्ट केलं आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने खेळण्यास नकार दिला, तर स्कॉटलँडला टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं तिकीट मिळेल. स्कॉटलंडच्या संघाला गट क मधून संधी मिळणार आहे. स्कॉटलंडचा संघ युरोपियन पात्रता फेरीतून बाद झाला होता. या गटात नेदरलंड, इटली आणि जर्सीच्या मागे राहिला होता.
सध्याच्या वेळापत्रकानुसार बांगलादेशचा संघ क गटात वेस्ट इंडिज, इंग्लंड, नेपाळ आणि इटली या संघासोबत आहे. जर बांगलादेशने आपली भूमिका सोडली नाही तर या गटात स्कॉटलंड जागा घेईल. बांग्लादेश कोलकात्यात तीन आणि मुंबईत एक सामना खेळणार आहे. बांगलादेशने या स्पर्धेतून माघार घेतली तर त्यांच्या खेळाडूंचं नुकसान होणार आहे. बांगलादेशचे माजी क्रिकेटपटूंनी ही बाब अधोरेखित केली आहे. टी20 संघाचा कर्णधार लिट्टन दास यानेही याबाबत बोललो तर अडचणीत येईल असं म्हंटलं आहे. बांगलादेशच्या खेळाडूंना टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळायचं आहे. आता याबाबत निर्णय 22 जानेवारीला होणार आहे.