मराठी भाषेच्या संवर्धनासाठी सजग सहभागाची गरज : डॉ. प्रदीप कर्णिक
ठाणे, ता. २१ (बातमीदार) : मराठी भाषा, साहित्य आणि नवनिर्मितीतील विविध वाटांचा प्रेरणादायी मागोवा ज्येष्ठ संशोधक व लेखक डॉ. प्रदीप कर्णिक यांनी आपल्या व्याख्यानातून घेतला. डॉ. वा. ना. बेडेकर स्मृती व्याख्यानमालेचे ४७ वे पुष्प त्यांनी मराठी भाषा, साहित्य व नवनिर्मितीतील विविध वाटा, या विषयावर गुंफले.
या व्याख्यानात डॉ. कर्णिक यांनी मराठी भाषेच्या समृद्ध साहित्यपरंपरेपासून ते आधुनिक काळातील नवनवीन अभिव्यक्तीपर्यंतचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर उलगडला. संत साहित्याने दिलेली मूल्यधारा, लोकसाहित्यातील मातीचा गंध, स्वातंत्र्योत्तर साहित्याची सामाजिक जाणीव आणि आजच्या डिजिटल युगातील नव्या साहित्यप्रवाहांमुळे मराठी साहित्य अधिक व्यापक, सशक्त आणि काळानुरूप झाले असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठी भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपल्या सांस्कृतिक अस्मितेची वाहक असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि नवनिर्मितीसाठी वाचक, लेखक, संशोधक व रसिक या नात्याने सर्वांनी सजगपणे योगदान देणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी केले. तंत्रज्ञान, डिजिटलायझेशन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांचा योग्य वापर केल्यास संशोधन व साहित्यनिर्मितीची प्रक्रिया कमी वेळात आणि अधिक प्रभावीपणे होऊ शकते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सुचित्रा नाईक होत्या. मराठी भाषा ही नवनिर्मितीची भाषा असून तरुण पिढीने शुद्ध मराठी बोलणे, लिहिणे, वाचणे आणि ऐकणे आवश्यक असल्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या व्याख्यानाला विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विमुक्ता राजे यांनी केले. विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर व सदस्य डॉ. महेश बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
.............