नेरूळ सेक्टर सहातील उद्यान आणि क्रीडांगणाची दुरवस्था
नागरिक त्रस्त
नेरूळ, ता. २१ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर सहातील राजमाता जिजाऊ उद्यान आणि तानाजी मालुसरे क्रीडांगण गेल्या काही वर्षांपासून अत्यंत जीर्ण व बकाल अवस्थेत असून, नागरिक त्रस्त झाले आहेत. उद्यानात सुरक्षा रक्षक नसल्याने सायंकाळनंतर नागरिकांना असुरक्षिततेचा सामना करावा लागतो. काही महिन्यांपूर्वी उद्यानालगतच्या शौचालयात रिक्षा चालकावर चाकूचा धाक दाखवून लूट व मारहाण झाल्याची घटना नोंदली होती.
क्रीडांगणात साचलेल्या पावसाच्या पाण्यात कचरा व मातीचे ढिगारे साठले असून, मैदानाची सपाटीकरण व जागडणी न झाल्याने ठिकठिकाणी खड्डे, दगड व पेव्हर ब्लॉक्स दिसतात. उद्यानातील झोपाळे तुटलेल्या अवस्थेतच असून, दुरुस्तीसाठी केलेला पाठपुरावा निष्फळ ठरला आहे. प्रवेशद्वार तसेच माहितीफलकांचा अभाव आणि संगीत यंत्रणा बसवण्याची नागरिकांची मागणीही अद्याप प्रलंबित आहे.
स्थानिकांनी समस्या सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवण्याचे स्पष्ट केले असून, संबंधित विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.