Europe finance India investments : युरोपमधील वित्तीय व्यवस्था, स्विस बँकिंगची विश्वासार्हता आणि निर्यात-विमा यांचा योग्य वापर केल्यास भारतीय उद्योग, उद्योजक आणि संपन्न कुटुंबांसाठी जागतिक पातळीवर भांडवल उभारण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत ‘सकाळ माध्यम समूह’ आणि ‘एपी ग्लोबाले’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पहिल्या ‘ग्लोबल इम्पॅक्ट फोरम’मध्ये व्यक्त करण्यात आले. ‘युरोपमधील वित्तपुरवठा रचना, स्विस बँक व्यवस्था’ या सत्रात आर्थिक विषयावर सविस्तर चर्चा झाली. या सत्रात व्हाइट रोज कॅपिटल ग्रुपचे व्यवस्थापकीय भागीदार डेनिझ आकगुल, ईएफजी प्रायव्हेट बँकेचे कार्यकारी संचालक अर्जुन इनामदार, ईएफजीचे वेल्थ प्लॅनर ह्यू ओ’डोनेल आणि स्विस एक्स्पोर्ट रिस्क इन्शुरन्सचे प्रकल्प वित्त व पायाभूत सुविधा प्रमुख कार्स्टन बोहलर यांनी मार्गदर्शन केले.
वित्तपुरवठा कसा मिळवायचा?
डेनिझ आकगुल यांनी युरोपिय बँका भारतीय कंपन्यांकडे कशा पद्धतीने पाहतात, हे स्पष्ट केले. ‘‘युरोपकडून वित्तपुरवठा मिळवताना दोन प्रमुख परिस्थिती असतात ः भारतीय कंपनीकडे फक्त भारतातूनच पैसा येणे आणि भारतासोबत युरोपमधूनही पैसा येणे,’’ असे त्यांनी सांगितले. स्वित्झर्लंडमध्ये सध्या शून्य टक्के व्याजदर असल्याने तिथून भांडवल उभारणे फायदेशीर ठरू शकते. मात्र, ‘‘युरोपिय बँका कोलॅटरल्सवर भर देतात. ज्या प्रकल्पासाठी कर्ज घेतले जाते, ते पैसे त्याच प्रकल्पावर खर्च होत आहेेत याकडे बँका बारकाईने पाहतात,’’ असे आकगुल म्हणाले.
स्विस खासगी बँका
अर्जुन इनामदार आणि ह्यू ओ’डोनेल यांनी स्विस खासगी बँकांची भूमिका स्पष्ट केली. ‘‘एकदा संपत्ती तयार झाली की ती जागतिक स्तरावर विविध क्षेत्रांमध्ये आणि भौगोलिकदृष्ट्या विविध ठिकाणी विखुरलेली असणे गरजेचे आहे,’’ असे त्यांनी सांगितले. भारतातील संपन्न कुटुंबे आणि उद्योजकांसाठी स्वित्झर्लंडची स्थिरता, दीर्घकालीन दृष्टिकोन आणि व्यावसायिक सल्ला सेवा अत्यंत महत्त्वाची ठरते. स्विस बँका केवळ पैसे सांभाळत नाहीत, तर पुढील पिढ्यांसाठी संपत्तीचे नियोजन करतात, असेही त्यांनी नमूद केले.
निर्यातविम्यामुळे सुरक्षितता
कार्स्टन बोहलर यांनी स्विस एक्स्पोर्ट क्रेडिट इन्शुरन्सची माहिती दिली. ‘‘स्वित्झर्लंडमधून निर्यात होत असेल, तर त्या व्यवहाराला विमा संरक्षण मिळते. कमी प्रीमियममध्ये हा विमा उपलब्ध होतो,’’ असे ते म्हणाले.
हा विमा केवळ स्विस निर्यातदारांसाठीच नव्हे, तर भारतीय आयातदारांसाठीही उपयुक्त ठरतो, कारण त्यामुळे व्यापारातील जोखीम कमी होते आणि वित्तपुरवठा सुलभ होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
सत्राचा संदेश : योग्य अभ्यास हवा
युरोपिय वित्तीय प्रणाली, स्विस बँकिंगची स्थिरता आणि निर्यात-विमा यांचा योग्य अभ्यास आणि वापर केल्यास भारतीय उद्योग, उद्योजक आणि कुटुंबे जागतिक स्तरावर सुरक्षित व परिणामकारक आर्थिक विस्तार करू केवळ कर्ज उभारणे नव्हे तर कॅशफ्लो, जोखीम व्यवस्थापन आणि दीर्घकालीन नियोजन याकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांनी सांगितले.