Rupali Patil Thombre: पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस होमपिचवरच घसरली. भाजपनं इथं मुसंडी मारली. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादीला कोणतीच कमाल दाखवता आली नाही. तर या निवडणुकीत अनेक ठिकाणी निवडणूक अधिकाऱ्यांनी गडबड केल्याच आरोप करण्यात येत आहे. यामध्ये सर्वात आघाडीवर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे या आहेत. त्यांनी यापूर्वी भाजपसह निवडणूक आयोग, अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. आपल्या पराभवाला हेच लोक कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी केला होता. आता त्यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत असा कोणताही प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागला तरी तो घेणार असा खणखणीत इशारा त्यांनी निवडणूक आयोगाला दिला आहे. त्यामुळे जिल्हा परिषद निवडणुकीत वाद रंगण्याची चिन्ह दिसू लागली आहे. राज्यातील अनेक महापालिकेत निवडणूक अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर पराभूत उमेदवारांना तात्काळ हरकती घेतल्याचे दिसून आले. काही ठिकाणी पराभूत उमेदवारांनी हा ईव्हीएमच निकाल असल्याचा आरोप केला. आता जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रुपाली पाटील ठोंबरे यांनी एल्गार करण्याचा इशारा दिला आहे.
कायदा हातात घ्यावा लागणार
जिल्हा परिषद, पंचायती समिती निवडणूक 2026 अर्ज भरून झाले. आता मतदान प्रक्रिया होईल.पण निवडणूक अधिकाऱ्यांना तुमचे काम कायदेशीर आणि पारदर्शक हवेच हे लक्षात ठेवा असा इशारा रुपाली ठोंबरे पाटील यांनी दिला. निवडणूक अधिकारी यांनी कायदेशीर व पारदर्शक निवडणूक प्रक्रिया पार पाडायची बरं जर कर्तव्यात कसून केली. फेरफार, लबाडी, सत्तेचा गैरवापर केला, पोलीस बळाचा गैरवापर केला तर सरळ सरळ आपण कायदा हातात घ्यायचा.त्यांना सरकारी खुर्चीवर बसून फेरफार भ्रष्टाचार करू शकतात तर आपण आपल्या न्याय हक्कासाठी, कायदेशीर प्रक्रियेसाठी कायदा हातात घ्यावाच लागेल, असा इशारा ठोंबरे यांनी दिला.
जिल्हा परिषद निवडणूक इन कॅमेरा चालवा
निवडणूक सर्व प्रक्रिया एकदम पारदर्शक इन कॅमेरा चालवायची अशी मागणी ठोंबरे यांनी केली. भाजप सोडून सर्व उमेदवारांनी एक टीम, एक कॅमेरा सतत निवडणूक अधिकाऱ्यांवर, निवडणूक प्रक्रियेवर ठेवावा.एक वेळ प्रचार कमी करा पण या लबाड लांडग्यांवर डोळ्यात तेल घालून लक्ष द्या.त्यामुळे भाजप सोडून सर्व पक्षाच्या उमेदवारांनी दक्ष रहावे तरच तरच आपण लोकशाही जिवंत ठेवू शकू.आपल्याच लोकशाही वाचण्यासाठी क्रांती करावी लागणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. चला तर मग लोकशाहीचा खून करणाऱ्या टोळीला ठोकून काढू.साम, दाम, दंड, भेद मोडून काढा असे आवाहन रुपाली पाटील ठोंबरे यांनी केले.