नेमळेत मंगळवारी
पुरस्कार वितरण
नेमळे ः नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेतर्फे गुरुवर्य (कै). ज. भा. पेंढारकर आदर्श शिक्षक पुरस्कार, (कै.) प्रमिला शिवराम जाधव आदर्श शिक्षिका पुरस्कार, (कै.) श्रीपाद गोविंद ऊर्फ तात्यासाहेब पोकळे समाजभूषण पुरस्कार वितरण सोहळा आणि नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम मंगळवारी (ता. २७) सकाळी १०.३० वाजता आयोजित केला आहे. सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा वजराट क्र. १ (ता. वेंगुर्ले) येथील उपशिक्षक तेजस बांदिवडेकर यांना, आदर्श शिक्षिका पुरस्कार जिल्हा परिषद शाळा सरस्वती विद्यालय कालेली (ता. कुडाळ) येथील उपक्रमशील शिक्षिका श्रीमती शामल धुरी, तसेच समाजभूषण पुरस्कार सावंतवाडी येथील हणमंत ऊर्फ अण्णा देसाई यांना जाहीर केला आहे. उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष आ. भि. राऊळ, प्राचार्य आर. के. राठोड यांनी केले आहे.
----
नर्सिंग कॉलेजमध्ये
आजपासून कार्यशाळा
कुडाळ ः येथील बॅ. नाथ पै नर्सिंग कॉलेज येथे २२ व २३ जानेवारीला ‘बेसिक रिसर्च मेथडॉलॉजी’ विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेमध्ये नर्सिंग क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्याख्याते विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत चालणाऱ्या या कार्यशाळेत नर्सिंग क्षेत्रातील विविध संशोधने, ती कशी करावीत व त्याचा समाजासाठीचा वापर अशा अनेक विषयांवर चर्चासत्र व त्या संदर्भात मार्गदर्शन यांचे आयोजन केले आहे. या कार्यशाळेला महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी लोटे, नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य मिलिंद काळे, प्रा. महांतेश कारगी, प्रा. धनंजय डोंगरे, प्रा. शिवप्रसाद हालेमनी, प्रा. दिव्या मोहनन या अनुभवी व्याख्यात्यांचे मार्गदर्शन सहभागी प्रशिक्षणार्थींना लाभणार आहे. नर्सिंग प्रशिक्षणार्थींनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्य कल्पना भंडारी, चेअरमन उमेश गाळवणकर यांनी केले आहे.
.....................
ओटवणे कापईवाडीत
आज गणेश जयंती
ओटवणे ः येथील कापईवाडी गणेश मंदिरामध्ये उद्या (ता. २२) माघी गणेश जयंती साजरी होणार आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता गणेश पूजन, १०.३० वाजता सत्यविनायक महापूजा, दुपारी १२.३० वाजता गणेश अथर्वशीर्ष पठण व महाआरती, १.३० वाजता महाप्रसाद, सायंकाळी ६ वाजता स्थानिक ग्रामस्थांचे भजन, ७ वाजता लहान मुलांचे कार्यक्रम, ७.४५ वाजता ‘फुगडी’, रात्री ८.१५ वाजता दोनपात्री विनोदी नाटक, ८.३० वाजता अष्टविनायक पारंपरिक दशावतार नाट्य मंडळ निरवडे यांचा माहेरवाशिणी ‘आई भवानी’ हा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन श्री गणेश मंदिर कापईवाडी व्यवस्थापन मंडळाने केले आहे.