रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबई आणि हैदराबाद हे संघ आमनेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा हैदराबादच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मुंबईकडून अखिल हरवडकर आणि आकाश आनंद यांनी सावध सुरुवात केली. पहिल्या विकेटसाठी या जोडीने 60 धावांची भागीदारी केली. अखिल हरवडकर 27 धावा करून बाद झाला आणि मुशीर खान मैदानात आला. त्यानंतर संघाच्या धावसंख्येत 6 धावांची भर पडली आणि आकाश आनंद 35 धावांवर तंबूत गेला. दोन विकेट 66 धावांवर पडल्यानंतर कर्णधार सिद्धेश लाड मैदानात उतरला. मुशीर खान आणि सिद्धेश लाड यांची भागीदारी फार काही टिकली नाही. 16 धावा दोघांनी मिळून केल्या आणि मुशीर खान बाद झाला. मुशीर खानचा डाव फक्त 11 धावांवर आटोपला. त्यामुळे मुंबईचा संघ अडचणीत आला.
कर्णधार सिद्धेश लाड आणि सरफराज खान यांनी चौथ्या विकेटसाठी 249 धावांची भागीदारी केली. या दोघांच्या भागीदारीमुळे मुंबईने 300 च्या पार धावसंख्या नेली. सिद्धेश लाडने 179 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकार मारत 104 धावा केल्या. पण रोहित रायुडूच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. सरफराज खान पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 164 चेंडूत 11 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 142 धावांवर खेळत आहे. तर हिंमाशू सिंगने चेंडूंचा सामना केला आणि त्याला एकही धाव करता आली नाही. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने 4 गडी गमवून 332 धावा केल्या. आता दुसऱ्या दिवशी यात आणखी धावांची भर पडणार यात काही शंका नाही. हैदराबादकडून रोहित रायुडूने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. तर मोहम्मद सिराज आणि नितीन साई यादवने प्रत्येकी 1 विकेट घेतली.
एलिट डी गटात मुंबई अव्वल स्थानी आहे. मुंबईने आतापर्यंत 5 सामने खेळले असून 3 सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे खात्यात 24 गुण असून नेट रनरेट हा +1.527 आहे. तर हैदराबादचा संघ पाचव्या स्थानावर आहे. आतापर्यंत पाचपैकी एका सामन्यात विजय आणि एका सामन्यात पराभवाचं तोंड पाहीलं आहे. हैदराबादचे 13 गुण असून नेट रनरेट हा +0.926 आहे.