पुणे : डेटिंग अॅपवर ओळख वाढवून तरुणांना धमकावून लूटणाऱ्या टोळीचा कोंढवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून मोबाइल, दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहिल अकील शेख (वय १९, रा. कोंढवा), नुहान नईम शेख (वय १८, रा. कोंढवा), शाहिद शाहनूर मोमीन (वय २५, रा. संतोषनगर, कात्रज), इशान निसार शेख (वय २५, रा. अंजलीनगर, कात्रज) आणि वाहिद दस्तगीर शेख (वय १८, रा. कोंढवा) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
Raigad Crime: रायगडमध्ये बनावट नोटा! मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा संशय; आतापर्यंत तिघांना अटकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी एका तरुणाला ११ जानेवारी रोजी डेटिंग अॅपवर संपर्क करून रात्री भेटण्यास बोलावले. आरोपींनी तरुणाला कोयत्याचा धाक दाखवत मोबाइल, दागिने हिसकावून घेतले. तसेच, एटीएममधून जबरदस्तीने रोख रक्कम काढण्यास भाग पाडले.
पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल क्रमांक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवली. पोलिस अंमलदार पुष्पेंद्र चव्हाण आणि सुहास मोरे यांना खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार कोंढवा परिसरातून आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींकडून तीन मोबाइल, कोयता आणि दोन दुचाकी जप्त केल्या आहेत. तपासादरम्यान याच टोळीने आणखी दोन ठिकाणी अशाच प्रकारचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. त्या अनुषंगाने स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक नवनाथ जगताप यांच्या सूचनेनुसार कोंढव्यातील पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे आणि त्यांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. नागरिकांनी सोशल मीडिया आणि डेटिंग अॅपवरील ओळखींबाबत सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.