मंत्रिपुत्र विकास गोगावले यांच्यासह आठ जण पोलिसांना शरण
महाड, ता. २३ (बातमीदार) : उच्च न्यायालयाने सरकारची कानउघाडणी केल्यानंतर रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले यांच्यासह अन्य आठ जण शुक्रवारी सकाळी ११ वाजता महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये शरण आले. महाड येथे राजकीय गटांमध्ये झालेल्या हाणामारीप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.
महाड नगर परिषद निवडणूक मतदानादरम्यान २ डिसेंबरला दुपारी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हाणामारीत वाहनांची तोडफोड करण्यात आली होती. तर काहीजण जखमीही झाले होते. यामध्ये रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास गोगावले आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रशांत जांबरे यांच्या समर्थकांमध्ये ही हाणामारी झाली होती. यानंतर पोलिसांनी विकास गोगावले यांच्यासह प्रशांत जांबरे व अन्य २९ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. दीड महिन्यांनंतर ही मंत्री पुत्र विकास गोगावले व त्यांचा पुतण्या महेश गोगावले यांना अटक होत नसल्याने रायगड पोलिस व सरकारच्या विरोधात न्यायालयाने ताशेरे उडले होते. न्यायालयाच्या कानउघाडणीनंतर विकास गोगावले आत्मसमर्पण करतील, असे आश्वासन देण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी ११ वाजता मंत्रिपुत्र विकास गोगावले त्यांचा पुतण्या महेश गोगावले, विजय मालुसरे, प्रशांत शेलार, वैभव मालुसरे, धनंजय मालुसरे, सूरज मालुसरे व सिद्धेश शेठ असे एकूण आठ जण महाड शहर पोलिस ठाण्यामध्ये शरण आले आहेत.
......
फोटो - विकास गोगावले