मिरज : तालुक्यात आगामी जिल्हा परिषद व पंचायतसमिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अर्ज माघारीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता अर्ज माघारीसाठी पक्षीय पातळीवर तसेच आघाडी-युतीस्तरावर नियोजन सुरू करण्यात आले आहे.
मतांची विभागणी टाळणे, अधिकृत उमेदवार निश्चित करणे आणि बंडखोरी रोखणे, या प्रमुख उद्देशाने हे नियोजन केले जात आहे. त्यात कोण माघार घेणार आणि कोण मैदानात असणार याबाबत चर्चा आता रंगल्या आहेत.
तालुक्यातील विविध गटांतून मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने अनेक ठिकाणी एका पक्षाकडून एकाहून अधिक इच्छुक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे पक्ष नेतृत्वासमोर योग्य उमेदवार निवडण्याचे आव्हान उभे राहिले आहे.
यासाठी स्थानिक पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी आणि प्रमुख नेत्यांच्या बैठका सुरू असून, प्रत्येक मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा आढावा घेतला जात आहे. उमेदवारांची लोकप्रियता, सामाजिक समतोल, कार्यकर्त्यांचा पाठिंबा आणि मागील निवडणुकांचे निकाल, या निकषांवर चर्चा होत आहे.
अर्ज माघारीसाठी इच्छुक उमेदवारांची समजूत काढण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. काही ठिकाणी पद, जबाबदारी किंवा भविष्यातील संधी देण्याचे आश्वासन देत बंडखोर उमेदवारांना माघार घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, तरीही ज्या इच्छुकांनी तयारी केली आहे त्यांनी स्पष्टपणे नकार देत निवडणूक लढवण्याचाच इरादा स्पष्ट केला आहे.
दरम्यान, उमेदवारांमध्येही हालचाली वाढल्या असून, माघार घ्यावी की, निवडणूक लढवावी, याबाबत समर्थकांशी चर्चा केली जात आहे. काही ठिकाणी शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अर्ज माघारीची अंतिम तारीख जवळ येत असताना तालुक्याच्या राजकारणात चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. अर्ज माघारीनंतर मिरज तालुक्यातील निवडणूक चित्र स्पष्ट होणार असून, खरी निवडणूक रणधुमाळी त्यानंतरच सुरू होईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. नाराजांना आमिष
तरी कशाचे?जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीनंतर लवकर कोणतीही मोठी निवडणूक होणार नाही, ज्यात कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. मार्केट कमिटीच्या निवडणुकाही लांब आहेत. शिवाय बाजार समितीच्या विभाजनाचीही चर्चा असल्याने त्याचे आश्वासन कार्यकर्त्यांना देण्यास अडचणी आहेत, त्यामुळे आता नाराजांची मनधरणी कोणत्या मुद्द्यावर होणार हे पाहावे लागणार आहे.