अल्पाक्षरी लेखन, पिंगेंचं साहित्यदर्शन
esakal January 24, 2026 04:45 PM

19577

अल्पाक्षरी लेखन, पिंगेंचं साहित्यदर्शन

सातार्डातील कार्यक्रम; अल्पाक्षरी, मर्मशोधक लेखनाचा वेध

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २३ ः सातार्डा पंचक्रोशी टिळक ग्रंथालयाच्या सहयोगाने झालेल्या कार्यक्रमात प्रसिद्ध साहित्यिक रवींद्र पिंगे यांच्या जन्मशताब्दी निमित्त ‘शब्दांचा जादुगार-रवींद्र पिंगे’ हा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रंसंगी प्रा. गजानन मांद्रेकर यांनी पिंगे यांच्या लेखनाची अल्पाक्षरी, मर्मशोधक, रसाळ आदी वैशिष्ट्ये उदाहरणांसह विशद केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा साहित्य प्रेरणा कट्ट्याचे समन्वयक विनय सौदागर यांनी पिंगे यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये सांगताना काही उताऱ्यांचे वाचन केले. उभरती साहित्यिक सौ. स्नेहा नारिंगणेकर यांनीही त्यांच्या लेखनाविषयी विचार मांडले. कट्ट्याच्या ज्येष्ठ सदस्या श्रीमती सरोज रेडकर व सोमा गावडे यांनी पिंगे यांच्या ‘आनंदपर्व’ या ललित लेखसंग्रहातील अनुक्रमे ‘पंजाबी धाबा : एक फर्मास खाद्यसंस्कृती’ व ‘साधी बाळबोध सुखं’ या लेखांचं अभिवाचन केले. ग्रंथालयाचे अध्यक्ष तथा निवृत्त मुख्याध्यापक ज्ञानेश्वर मांजरेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रायोजक ज्ञानदीप राऊळ, आरोंदा हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक अरुण धर्णे, स्थानिक पोलिस पाटील सौ. वनिता मयेकर तसेच सामाजिक कार्यकर्ते सावळाराम शिरोडकर, सौ. शर्मिला मांजरेकर व सौ. श्रुतिका बागकर याही उपस्थित होत्या. ग्रंथालयाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मांजरेकर यांनी प्रास्ताविक केले, तर धनंजय केरकर यांनी आभार मानले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.