मालाड रेल्वे स्थानकात आलोक सिंहला चाकू भोसकून संपवलं, वडील राजनाथ सिंहांच्या ताफ्यातील कमांडो, आरोपी ओंकार शिंदेचा जुना राग?
सत्यम सिंह January 25, 2026 01:13 PM

मुंबईच्या मालाड रेल्वे स्थानकात शनिवारी सायंकाळी थरकाप उडवणारी घटना घडली होती. इथं एका प्राध्यापकाची  रेल्वे स्थानकावर धारदार शस्त्राने भोसकून हत्या केली होती. या हत्येच्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलं आहे. लोकलमधून उतरताना झालेल्या एका क्षुल्लक वादाचे रूपांतर भीषण हत्येत झालं होतं. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी वेगाने हालचाली करत मुख्य आरोपीला अटक केली आहे. ओंकार शिंदे असं आरोपीचं नाव आहे.

प्राथमिक माहितीनुसार, मालाड रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर शनिवारी प्रवाशांची मोठी वर्दळ होती. यावेळी अलोक सिंह नावाचे प्राध्यापक लोकलमधून उतरत असताना, गर्दीमुळे त्यांचा दुसऱ्या एका प्रवाशाला धक्का लागला. यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक सुरू झाली. मात्र, रागाच्या भरात असलेल्या आरोपी ओंकार शिंदेनं अलोक सिंग यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. आरोपीने सिंह यांच्या पोटात शस्त्र खुपसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. त्यांना तातडीने रुग्णालयात हालवण्यात आलं. मात्र, तोपर्यंत दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला.

हल्ला केल्यानंतर आरोपी ओंकार शिंदे गर्दीचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण रेल्वे परिसरात खळबळ उडाली आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपासचक्रं फिरवली. स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना आरोपीची ओळख पटवली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेत त्याला ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपीला सध्या बोरिवली पोलीस ठाण्यात नेण्यात आले असून, तिथे त्याची सखोल चौकशी सुरू आहे. आरोपीने हे कृत्य रागाच्या भरात केले की यामागे आणखी काही कारण आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.