महापालिका निवडणुकीत अचानक शाईऐवजी मार्कर पेन वापरण्याच्या निर्णयामुळे राज्य निवडणूक आयोगाची विश्वासार्हताच पुसली गेली! या निर्णयावरून टीकेचे फटकारे बसताच आयोगाला शहाणपण सुचले असून, जिल्हा परिषद, तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी म्हैसूर शाई वापरण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका ५ फेब्रुवारी रोजी होत असून, ७ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर, परभणी, लातूर, तसेच धाराशिव या जिल्ह्यांचा राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आढावा घेतला. यावेळी त्यांनी २०१० पासून मतदान प्रक्रियेत मार्कर पेन वापरण्यात येत असल्याचे सांगितले. परंतु नुकत्याच झालेल्या मनपा निवडणुकीत मार्कर पेनने करण्यात आलेली खूण लगेच पुसली जात असल्याने वादंग उठले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयावर टीकेची झोड उठली. त्यानंतर आयोगाने सर्व जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मार्कर पेनऐवजी म्हैसूर शाई वापरण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली.








