बॅग पॅकर्स – साहसी बुग्याल ट्रेक
Marathi January 25, 2026 08:26 PM

>> चैताली कानिटकर, [email protected]

देवभूमी उत्तराखंडातील अली बेडनी बुग्याल हा ट्रेक करणे ट्रेकर्ससाठी वेगळी ओळख मिळाल्यासारखे असते.

हिमालयाच्या कुशीत अशी काही स्थळं आहेत, जिथे निसर्ग केवळ सुंदर नाही, तर पवित्रही आहे. देवभूमी उत्तराखंडातील अली-बेदनी बुग्याल हे असंच एक स्थान आहे, जिथे भगवान शिव-पार्वतींच्या चरणस्पर्शाची, देवी नंदादेवीच्या आगमनाची आख्यायिका आजही सांगितली जाते. बेदनी बुग्यालमध्ये सरोवर – बेदनी कुंड. या कुंडाशी काही पौराणिक कथा जोडलेल्या आहेत. भगवान शिव आणि देवी पार्वती कैलाश पर्वताकडे जाताना येथे थांबले आणि या कुंडात स्नान केले. या कारणामुळे कुंडाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरी कथा अशी की, देवी नंदादेवी यांनी महिषासुरमर्दिनी रूप धारण करून रक्तबीज दानवाचा वध येथे केला होता आणि त्या पराक्रमानंतर ती येथे आली. या कथांमुळे हे स्थान पवित्र मानले जाते.

अली बेदनी बुग्याल हा ट्रेक 6 दिवसांचा असून मध्यम पातळीतील आहे. याची उंची 12500 फूट आहे. मार्च ते मे, ऑक्टोबर-नोव्हेंबर याच कालावधीत हा ट्रेक करता येतो. ट्रेकचे आरंभस्थान ऋषीकेश असून अली बेदनी बुग्यालकडे जाणारा प्रवास ऋषिकेश ते लोहाजंगपर्यंत गाडीचा आहे. ऋषिकेश हे भारतातील आध्यात्मिक शहर आहे, ज्याला योग नगरी म्हणूनही ओळखले जाते. ऋषिकेश ते लोहाजंग या नागमोडी वळणांच्या प्रवासात तीन पंच प्रयाग, देवप्रयाग, रुद्रप्रयाग आणि कर्णप्रयाग ओलांडून जावे लागतात.

लोहाजंगला पोहोचताच नंदा घुंटी शिखराचे सुंदर दृश्य दिसते. इथे पोहोचल्यानंतर स्वतला हवामानाशी जुळवून घेण्यासाठी परिसरात थोडासा फेरफटका मारण्यासाठी ट्रेक लीडर सूचना देतात.

दुसरा दिवस ट्रेकिंगचा खरा पहिला दिवस. लोहाजंग गावातून ट्रेकिंगला सुरुवात करून दिडाना गावापर्यंतचा ट्रेक 6-7 किमी.चा आहे. हे अंतर चालण्यासाठी 4 ते 5 तास लागतात. दिडनाकडे ट्रेकिंग सुरू होत जंगलातून चढाई व उतरण केल्यानंतर नीलगंगा नदी दिसते. इथून तीव्र चढाई येते जी थेट दिडाणा गावात घेऊन जाते. हा मार्ग थकवणारा आहे. म्हणूनच लीडरच्या सूचनेनुसार प्रत्येकाने स्वतच्या क्षमतेनुसार चालत ट्रेक करणे उत्तम. दिडाणा हे पारंपरिक घरं असलेलं टुमदार गाव. जिथे स्थानिक संस्कृती अनुभवता येते.

तिसऱ्या दिवशी दिडाणा गावापासून खोबल तालपर्यंतचा ट्रेक अली बुग्यालमधून जातो. हा ट्रेक प्रचंड अवघड आहे. अली बुग्यालकडे चढाई सुरू केल्यावर सुंदर कुरणं नजरेस पडतात. पुढे टोलपाणी हे जंगल भागातील एकमेव पाण्याचा स्रोत असलेले ठिकाण लागते. जंगल ओलांडताच  विस्तीर्ण अली बुग्याल कुरण येते. कुरणाच्या कडय़ावरून चालताना दूरवर मृगथुनी पर्वत आणि त्रिशूल पर्वताचे चित्तथरारक दृश्य दिसते. अली बुग्याल येथून खोबल तालकडे ट्रेकिंग सुरू ठेवत कॅम्पसाईटपर्यंत पोहचता येते. ट्रेकर्स येथेच रात्रीचा मुक्काम  करतात.

पुढचा ट्रेकही तितकाच कठीण. इथला निसर्ग मोहवून टाकणारा आहे. उंच उंच चौखंबा, नीलकंठ, नंदा घुंटी आणि त्रिशूल पर्वत यांसारख्या भव्य शिखरांचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडते. इथले प्रसिद्ध  ठिकाण म्हणजे पवित्र बेदनी कुंड. पौराणिक कथांचे दर्शन घडवित दर 12 वर्षांनी होणाऱ्या राज जाट यात्रेचे हे एक प्रमुख स्थळ. या तलावात आजूबाजूच्या शिखरांचे प्रतिबिंब पडते. अतिशय सुंदर असे ते दृश्य असते. पुढे रात्रीच्या कॅम्पिंगसाठी घैरोली पाटलकडे उतरण लागते. हिरवळीच्या जंगलातील हा शांत परिसर रात्रीची कॅम्प साईट आहे.

पाचवा दिवस ट्रेकिंग साहसाचा शेवटचा दिवस. वानला उतराल्यानंतर वानहून लोहाजुंगला गाडीने नेले जाते. इथून वानसाठी  तीव्र उतरणीने ट्रेक सुरू होतो, जो नीलगंगा नदीकडे घेऊन जातो. नदी ओलांडल्यानंतर पायवाट हळूहळू चढाईत बदलते. कठीण चढाईच्या या ट्रेकमध्ये ऊर्जा कायम ठेवण्यासाठी घेण्यासाठी लहान ब्रेक घेणे, सुका मेवा, एनर्जी बार खात राहणे उचित आहे. येथून पुढे लागणारे रान का धर हे निसर्गरम्य ठिकाण आहे. वान येथे लोहाजंगला जाण्यासाठी वाहने येतात.

ट्रेकर्ससाठी हा ट्रेक पूर्ण करणे म्हणजे वेगळी ओळख प्राप्त करणसारखे आहे. शेवटचा सहावा दिवस लोहाजंग ते ऋषीकेश हा 250 किमीचा प्रवास ट्रेकच्या आठवणींना उजाळा देत राहतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.