नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये बदल आणि विकास हे प्रमुख मुद्दे ठरले. मुंबईतील बहुतांश मतदारांनी या भावनेतून मतदान करत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मात्र धारावीने वेगळा कौल दिला. सात प्रभागांपैकी दोन काँग्रेसकडे, चार शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) कडे गेले. एक जागा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मिळाली, तर भाजपला पुन्हा एकदा धारावीत प्रवेश करता आला नाही.
या पार्श्वभूमीवर, धारावी पुनर्विकास प्रकल्प (डीआरपी) वेग घेत असताना झोपडपट्टीतील नागरिकांच्या शंका, चिंता दूर करण्यासाठी कोणती पुढील पावले उचलली जात आहेत. याबाबतडीआरपी आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी काही मुद्दे मांडले आहेत.
डीआरपी - एसआरए आणि धारावीतील नागरिकांमध्ये संवादाचा अभाव आहे का? नागरिकांचे म्हणणे ऐकले जात नाही, असे धारावीकरांचे म्हणणे आहे का ?
वैयक्तिक इच्छा आणि राजकीय निष्ठा यांची गल्लत होता कामा नये. या दोन गोष्टी कधीच समान नसतात. राजकीय निष्ठा ही स्वतःच्या किंवा कुटुंबाच्या हिताच्या आड येऊ शकत नाही. धारावीतील सुमारे १.२५ ते १.५० लाख कुटुंबांपैकी ९० हजारांहून अधिक कुटुंबांनी घरांचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. हाच या प्रकल्पाला मिळालेला सर्वात मोठा कौल आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्प हा देशाच्या इतिहासातील सर्वांत समावेशक आणि सर्वांगीण शहरी पुनर्निर्माण प्रकल्प आहे. प्रत्येक पात्र, प्रामाणिक झोपडपट्टीधारकाला नवीन घर मिळणार आहे. ‘सर्वांसाठी घरे’ या तत्त्वावर आधारित हा प्रकल्प धारावीला एक सशक्त, शाश्वत आणि समावेशक शहरी वसाहत म्हणून उभी करणार आहे. मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर बनवण्याच्या राज्य सरकारच्या उद्दिष्टाच्या दिशेने हा एक मोठा टप्पा आहे. धारावीकरांना बदल हवा आहे आणि त्यांनी तो पुनर्विकासाच्या माध्यमातून स्पष्टपणे व्यक्त केला आहे.
धारावीतील शाळांचा दर्जा उंचावण्यात येणार आहे. ३६ सरकारी आणि २५ खासगी शाळा एकत्र करून अत्याधुनिक शिक्षण संकुले उभारली जातील. स्वच्छ आणि सुसज्ज वर्गखोल्यांमध्ये शिक्षण मिळेल. आरोग्य सुविधांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रे, प्रसूती सेवा, दवाखाने आणि रुग्णालये उभारली जातील. उपचारासाठी दूर जाण्याची गरज भासणार नाही. ५०० हून अधिक धार्मिक स्थळांचे पुनर्नियोजन अत्यंत आदराने आणि योग्य पद्धतीने केले जाईल. सर्व धर्मांचा सन्मान राखला जाईल. महाराष्ट्र निसर्ग उद्यान ते माटुंगा यांना जोडणारा हरित मार्ग, मोठे मध्यवर्ती उद्यान आणि जवळपास १०० एकर मोकळी व हिरवी जागा धारावीला आरोग्यदायी बनवेल. मिठी नदी स्वच्छ करून जैवविविधतेसह नदी किनाऱ्यांचा देखील विकास केला जाईल. हा प्रकल्प केवळ बांधकाम नाही, तर नवसंजीवन आहे.
नोकऱ्या आणि उद्योगवाढीबाबत काय ?
धारावीतील विविध उद्योग हेच तिचे बळ आहे. सुमारे २० हजार लघुउद्योगांना अधिक चांगल्या कामाच्या जागा मिळतील. यामुळे सुमारे १.५ लाख कामगारांना आधार मिळेल. कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि उद्योजकतेला चालना देणाऱ्या उपक्रमांमुळे नव्या संधी निर्माण होतील. पुनर्विकासानंतर पाच वर्षे व्यवसायांना करमाफी दिली जाणार आहे.
धारावीकरांसाठी संदेश
हा प्रकल्प मानवकेंद्री आहे आणि पूर्णपणे राज्य सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. खासगी विकासकांवर अवलंबून राहण्याचा प्रश्न नाही. स्वच्छ परिसर, सन्मानाचे घर, समान संधी, सुरक्षितता आणि रोजगार यासाठी हा पुनर्विकास आहे. धारावी आता आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून नव्हे, तर परवडणारी घरे, जागतिक दर्जाच्या सुविधा, घरे आणि उपजीविका एकत्र अनुभवता येतील असे नियोजनबद्ध आधुनिक शहर म्हणून ओळखली जाईल.