रावेत, ता.२५ : रावेत, आकुर्डी परिसरात वाहनांची वाढती संख्या, अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे मुकाई चौक, भोंडवे चौक, रावेत पंपिंग स्टेशन चौक, बीआरटी रस्ता तसेच रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर सकाळ-संध्याकाळी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. नोकरदार वर्गाला कामावर जाणे तर विद्यार्थ्यांना परीक्षांच्या काळात वेळेत पोहोचणे कठीण जात आहे. हवेच्या प्रदूषणाने नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होत असून अपघाताचाही धोका वाढला आहे.
रावेत, आकुर्डी परिसरात अलीकडच्या काही दिवसांत वाढलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. मुख्य चौक, सेवा रस्ते तसेच अंतर्गत रस्त्यांवर सकाळ-संध्याकाळ वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी, रुग्णवाहिका आणि शालेय बस चालकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडीची कारणे
- रस्ते दुरुस्तीची अपूर्ण कामे
- पदपथ, गटारांसाठी खोदलेले खड्डे
- अनधिकृत पार्किंग, सिग्नलचा अभाव
- अपुरे वाहतूक पोलिस कर्मचारी
- भक्ती-शक्ती ते मुकाई चौक रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी
दररोज ऑफिसला जाताना किमान अर्धा तास जास्त वेळ जातो. अपूर्ण कामांमुळे रस्ते अरुंद झाले असून लहानसा अपघात झाला तरी संपूर्ण परिसर ठप्प होतो.
- संजय पाटील, रहिवासी, रावेत
वाहतूक कोंडीमुळे खूप त्रास होतो. वाहनांचा आणि त्यांच्या हॉर्नच्या आवाजामुळे रक्तदाब वाढतो. संध्याकाळी तर रस्त्यावर उभे राहणेही कठीण होते.
- वैशाली देशमुख, रहिवासी, आकुर्डी
मागण्या काय ?
- प्रशासनाकडे तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात
- अपूर्ण रस्ते, पदपथांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत
- ट्रॅफिक वॉर्डन, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवावी
- अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी
- सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करावी
नवनवीन गृहप्रकल्प
रावेत, किवळे, मामुर्डी आणि वाल्हेकरवाडी भागांत मोठ्या प्रमाणावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प उभे राहत आहेत. मात्र, त्या तुलनेत रस्त्यांचे रुंदीकरण, पर्यायी मार्ग आणि वाहतूक व्यवस्थापन झालेले नाही. अनेक ठिकाणी रस्ते अरुंद असून खड्डे, उघड्या गटारांची कामे आणि बीआरटी मार्गामुळे वाहतुकीचा वेग मंदावत आहे. रस्त्याच्या कडेला अनियमित पार्किंग, फेरीवाले व विक्रेत्यांनी अतिक्रमणे केल्याने रस्ता अधिकच संकुचित होत आहे. शाळांच्या बसेस, खासगी वाहने आणि अवजड वाहनांची एकाचवेळी गर्दी झाल्याने अपघाताचा धोका वाढत आहे.
भुयारी मार्ग, पुलाची गरज
मुकाई चौक हा रावेत, किवळे, मामुर्डी, वाल्हेकरवाडी आणि पुणे मुंबई महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा जंक्शन आहे. येथे चारही बाजूंनी येणाऱ्या वाहनांची संख्या मोठी असल्याने केवळ सिग्नलवर आधारित वाहतूक नियंत्रण अपुरे ठरत आहे. त्यामुळे पर्याय म्हणून मुकाई चौक येथे भुयारी मार्ग किंवा उड्डाणपुलाची अत्यंत गरज निर्माण झाली आहे. संत तुकाराम महाराज पुलावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. हा पूल एकमेव असल्याने किरकोळ अपघात, वाहन बिघाड किंवा जास्त वाहतूक झाल्यास संपूर्ण परिसर ठप्प होतो. त्यामुळे या ठिकाणी अजून एका समांतर पुलाची उभारणी करणे अत्यावश्यक आहे. अतिरिक्त पूल झाल्यास वाहतूक विभागली जाईल, अपघाताचा धोका कमी होईल आणि आपत्कालीन सेवांना मोकळा मार्ग मिळेल.
मुकाई चौकातील सिग्नल व्यवस्था सुरळीतपणे चालू आहे. काही कर्मचारी इथे नेहमीच तैनात असतात. मात्र वाहनांची संख्या वाढल्याने मुकाई चौकात साप्ताहिक सुटीच्या दिवशी अतिरिक्त वाहतूक कोंडी होत आहे. याशिवाय, अरुंद रस्ते, बस डेपोमुळेही कोंडी होत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी लवकर प्रयत्न केले
जातील.
- विजय वाघमारे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, देहूरोड पोलिस ठाणे