निफाड: निफाडचे उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यांच्या शेतात बाहुल्या, लिंबू आणि गुलाल टाकलेली तशा धमकीची चिठ्ठी आढळून आल्याने हा जादूटोण्याचा प्रकार आहे किंवा काय, याबाबत तर्कवितर्क सुरू आहेत. दरम्यान, निफाड पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल कुंदे यांच्या बांधावर रात्रीच्या सुमारास अज्ञाताने लिंबांमध्ये टाचण्या टोचलेल्या, बिबे, हिरव्या बांगड्या, तसेच नारळावर शेंदूर लावलेला प्रकार शनिवारी सकाळी उघड झाला. टाचण्या टोचलेल्या तीन काळ्या बाहुल्या आढळून आल्या असून, प्रत्येक बाहुलीला स्वतंत्र चिठ्ठी बांधलेली होती.
हा प्रकार शेतात कामानिमित्त गेलेले जयदीप कुंदे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ निफाड पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी मिळालेल्या चिठ्ठ्यांमध्ये कुंदे कुटुंबातील तिन्ही भावांविषयी धमकीवजा मजकूर लिहिण्यात आला असून, एका चिठ्ठीत उपनगराध्यक्ष अनिल पा. कुंदे यांना ‘तुम्हाला मारण्याची सुपारी मला दिली आहे’ अशा शब्दांत थेट ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
उर्वरित चिठ्ठ्यांमध्ये उत्तम कुंदे व सुनील कुंदे यांच्याबाबतही इशारादायक उल्लेख करण्यात आला आहे. धमकीच्या चिठ्ठ्यांमध्ये काळी जादू, तांत्रिक उपाय व अमंगल शक्तींचा उल्लेख असल्याने संबंधितांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत निफाडचे उपनिरीक्षक राजेंद्र बाविस्कर, पोलिस कर्मचारी नितीन सांगळे, विनोद जाधव व भास्कर पवार यांनी घटनास्थळी पाहणी केली.
धमकीच्या चिठ्ठ्या ताब्यात घेऊन त्या हस्ताक्षरतज्ज्ञ व फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. संशयितांचा शोध सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा अंधश्रद्धा व गुन्हेगारी कृत्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.
धक्कादायक प्रकार! नागपुरात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फोटो व्हायरल; ओळख आली अंगलट, आक्षेपार्ह फाेटाे दिले अन्..हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित आहे. माझ्या राजकीय अस्तित्वाला पायबंद घालण्यासाठी हा किळसवाणा प्रकार करण्यात आला असावा. गेल्या २५ वर्षांपासून मी गोरगरीब जनता व निफाड शहराच्या विकासासाठी काम करत आहे. अशा घाणेरड्या प्रवृत्तीमुळे मी घाबरणार नाही. कोणी कितीही ठार मारण्याची सुपारी दिली तरी मी थांबणार नाही.
- अनिल पा. कुंदे, उपनगराध्यक्ष, निफाड
महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा होऊन तेरा वर्षे झाली असली तरी, त्याची कडक अंमलबजावणी होताना दिसत नाही. कायद्याची प्रभावी अंमलबजावणी झाली, तर अशा अंधश्रद्धायुक्त व गुन्हेगारी प्रकारांना मोठ्या प्रमाणात आळा बसेल. नागरिकांनी अशा तोडग्यांवर विश्वास ठेवू नये. असे प्रकार आढळल्यास तत्काळ पोलिस किंवा अंनिस कार्यकर्त्यांना कळवावे.
- डॉ. टी. आर. गोराणे, प्रधान सचिव, अंधश्रद्धा निर्मूलन समिती