'व्हाट्सअप ग्रुपची सेटिंग ओन्ली ॲडमिन करावी'
esakal January 26, 2026 08:45 AM

तळेगाव ढमढेरे, ता. २४ : जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत ग्रुप ॲडमिनने आपल्या व्हाट्सअप ग्रुपची सेटिंग ओन्ली ॲडमिन अशी करावी असे आवाहन शिक्रापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
नोटीसमध्ये लिहिले आहे की, सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया चालू असून, आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा प्रचार हा सभा व कोपरा सभा यापेक्षा समाज माध्यमांवरून जास्त होत असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रचारात विरोधी पक्षाच्या उमेदवाराची प्रतिमा हनन करण्यासाठी खोटे आरोप व प्रत्यारोप करून निवडणुकीच्या निकालावर परिणाम करण्याच्या उद्देशाने सोशल मीडियावर संदेश, फोटो व व्हिडिओ व्हायरल झाल्यास कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपण ग्रुप ॲडमिन असलेल्या व्हाट्सअप ग्रुपची सेटिंग निवडणूक होईपर्यंत ओन्ली ॲडमिन अशी करून ठेवावी. त्यामुळे कोणीही ग्रुप सदस्य ग्रुपवर आक्षेपार्ह व दुसऱ्या उमेदवाराची प्रतिमा हनन करण्यासाठी खोटे आरोप व प्रत्यारोप करून निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल अशा प्रकारचे संदेश, फोटो व व्हिडिओ ग्रुपवर टाकणार नाही. दोन उमेदवार व त्यांच्या समर्थकांमध्ये वाद होणार नाही, निवडणुका शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यास मदत होईल.
निवडणूक काळात ग्रुपवर संदेश, फोटो किंवा व्हिडिओ व्हायरल होऊन अनुचित प्रकार किंवा वाद-विवाद होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास ग्रुप ॲडमिनला जबाबदार धरून कायदेशीर कारवाई केली जाईल असे ग्रुप ॲडमिनसाठी प्रसिद्धीस दिलेल्या नोटिसीमध्ये नमूद केले आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.