पुणे - पोलिस दलातील उल्लेखनीय सेवेबद्दल प्रजासत्ताकदिनाच्या पूर्वसंध्येला लाच लुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे पोलिस उपअधिक्षक दयानंद गावडे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शंकरराव शिळीमकर, राज्य राखीव दलातील लेखनिक सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप साहेबराव सावंत यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले.
पिंपरी चिंचवड पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यामध्ये सध्या पिंपरी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळणारे विठ्ठल कुबडे यांना राष्ट्रपतींचे पोलिस दलातील उत्कृष्ट सेवेबद्दल तर चिखली पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक (गुन्हे) अमोल फडतरे यांना राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ जाहीर झाले आहे.
तसेच येरवडा खुल्या कारागृहातील हवालदार राजेंद्र धनगर, येरवडा मध्यवर्ती कारागृहातील हवालदार सुनील लांडे यांना राष्ट्रपतींचे उल्लेखनीय सेवेबाबत पदक जाहीर झाले आहेत. ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलिस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली. बिनतारी संदेश मुख्यालयात कार्यरत असलेले पोलिस निरीक्षक महेंद्र कोरे यांना देखील पदक जाहीर झाले आहे.
गावडे हे मूळचे फलटण तालुक्यातील गणवरे गावचे असून, ते १९९६ मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले होते. मुंबई परिसरात १२ वर्ष त्यांनी काम केले. त्यानंतर रायगड, सोलापूर आणि पुणे ग्रामीण पोलिस दलात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
अविनाश शिळीमकर तांभाड (ता. भोर) येथील असून, ते १९९३ मध्ये दलात पोलिस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले. त्यानंतर मुंबई शहर, सातारा, नागपूर शहर गुन्हे शाखा, अहिल्यानगर विशेष शाखा आणि सध्या पुणे ग्रामीण गुन्हे शाखेत अशा विविध ठिकाणी त्यांनी प्रभावी सेवा बजावली आहे.
यवत हद्दीमध्ये २०२३ मध्ये भीमा नदीपात्रात आढळलेले सात मृतदेह प्रथमदर्शनी सामूहीक आत्महत्या दिसत असताना बारकाईने तपास करत ते खून असल्याचे उघडकीस आणले. त्या गुन्ह्यातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली.
सासवड येथून २०२४ मध्ये चोरीला गेलेले ईव्हीएम मशिन चोरट्यांसह हस्तगत करणे, नागपूर येथे कुख्यात आरोपी राजा गौस यास जेरबंद करुन, ३८ गुन्ह्यांची उकल, तसेच उरळी कांचन येथे आप्पा लोंढे टोळीवर कारवाई आदी प्रकरणे त्यांनी यशस्वीरीत्या हाताळली आहेत.
सहाय्यक पोलिस आयुक्त विठ्ठल कुबडे यांना दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. कुबडे हे १९९३ मध्ये पोलिस दलात रुजू झाले होते. नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस ॲकेडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची पहिली नियुक्ती भंडारा येथे झाली होती. गोरेगाव, सालेकसा, शिवहोरा आदी नक्षल भागात त्यांनी काम केले आहे. तसेच परभणी, नांदेड, उस्मानाबाद, बुलडाणा आणि पिंपरी चिंचवड येथे काम केले आहे.
फडतरे हे फेब्रुवारी २०१४ मध्ये पोलिस सेवेत उपनिरीक्षक म्हणून रुजू झाले. नाशिकच्या महाराष्ट्र पोलिस अकादमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर फेब्रुवारी २०१५ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात पहिली नियुक्ती झाली. नक्षलग्रस्त भागात कमांडो पथकात उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी केली. त्यांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल २०२३ मध्ये राष्ट्रपतींचे ‘पोलिस शौर्य पदक’ मिळाले होते.