Border 3: जवळपास 30 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केलेल्या ‘बॉर्डर 2’ (Border 2) ने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. देशभक्तीच्या भावनांना हात घालणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असून, अवघ्या काही दिवसांतच चित्रपटाने विक्रमी कमाई केली आहे. या तुफान यशानंतर आता चाहत्यांच्या मनात एकच प्रश्न आहे ‘बॉर्डर 3’ येणार का? याच पार्श्वभूमीवर निर्मात्यांनी तिसऱ्या भागाबाबत मोठी घोषणा केली असून, त्यात एक महत्त्वाचा ट्विस्टही समोर आला आहे. ‘बॉर्डर 2’च्या यशानंतर फ्रँचायझीचा पुढचा प्रवास कसा असेल, याकडे सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित ‘बॉर्डर 2’ चा जबरदस्त बोलबाला आहे. प्रेक्षकांचा मिळणारा भरघोस प्रतिसाद आणि बॉक्स ऑफिसवरील दमदार कमाईनंतर आता ‘बॉर्डर 3’ बाबत चर्चा रंगू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर टी-सीरिजचे मालक भूषण कुमार यांनी तिसऱ्या भागासंदर्भात महत्त्वाचे वक्तव्य केलं आहे. भूषण कुमार यांच्या प्रॉडक्शनमधील ‘बॉर्डर 2’ सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. बॉर्डर फ्रँचायझीच्या चाहत्यांसह सर्वसाधारण प्रेक्षकही चित्रपटाचा मनसोक्त आनंद घेत आहेत. या चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत 172.20 कोटी रुपयांची वर्ल्डवाइड कमाई केली आहे. या यशानंतर आता पुढील भागाबाबत नियोजन सुरू झाल्याचं बोललं जात आहे.
टी-सीरिजचे भूषण कुमार आणि दिग्दर्शक अनुराग सिंह यांनी ‘बॉर्डर 2’ साठी एकत्र काम केलं आहे. आता या चित्रपटाच्या यशानंतर हे दोघे पुढील प्रोजेक्टसाठीही पुन्हा एकत्र येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. भूषण कुमार यांनी सांगितलं की, दोघांनी एका नव्या चित्रपटावर काम सुरू केलं असून, त्यानंतरच ‘बॉर्डर 3’ चा विचार केला जाईल.
हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत भूषण कुमार आणि अनुराग सिंह यांनी सांगितलं की, ‘बॉर्डर 2’ सुरू होण्याआधी ते एका वेगळ्या चित्रपटावर एकत्र काम करत होते. तो प्रोजेक्ट आता पुन्हा सुरू केला जाणार आहे. भूषण कुमार म्हणाले, 'आम्ही दोघांच्या कंपन्यांमध्ये जॉइंट व्हेंचर करत आहोत. अनुराग दिग्दर्शन करणार आहेत आणि हा पूर्णपणे वेगळा आणि नवा चित्रपट असेल. त्यानंतर योग्य वेळी ‘बॉर्डर 3’ बनेल. ‘बॉर्डर 3’ ला हिरवा कंदील मिळेल का, या प्रश्नावर भूषण कुमार म्हणाले, “ही खूप मोठी फ्रँचायझी आहे. अनुराग यांनी ती पुन्हा उभी करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जवळपास 30 वर्षांनंतर एखादी गोष्ट परत आणून तिला इतकं प्रेम मिळत असेल, तर आम्ही नक्कीच ती पुढे नेणार आहोत.”
भूषण कुमार यांनी हेही स्पष्ट केलं की, ‘बॉर्डर 3’ हा त्यांचा आणि अनुराग सिंह यांचा पहिला पुढचा प्रोजेक्ट नसेल. ‘बॉर्डर 2’ आधी जो चित्रपट रखडला होता, तो आधी पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. “त्या पुढच्या चित्रपटानंतर आम्ही पुन्हा ‘बॉर्डर’कडे वळू,” असंही त्यांनी सांगितलं.
अनुराग सिंह दिग्दर्शित ‘बॉर्डर 2’ हा जेपी दत्ता यांच्या 1997 मधील सुपरहिट ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात सनी देओल, वरुण धवन, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी प्रमुख भूमिकेत आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या आधी, 23 जानेवारी रोजी हा चित्रपट सिनेमाघरांत प्रदर्शित झाला.