‘बॉर्डर 2’ हा चित्रपट सध्या सगळीकडे गाजत आहे, गेल्या आठवड्यात रिलीज झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धूमाकूळ घातला असून 100 कोटींचा टप्पाही ओलांडल्याचं समजतं. दरम्यान या चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणारा अभिनेता वरूण धवन हा मात्र पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र यावेळी तो चित्रपट किंवा अभिनयामुळे नव्हे तर त्याच्या एका स्टंटमुळे चर्चेत आहे. मुंबई मेट्रोमधून प्रवास करताना वरूण धवन याने केलेल्या कृतीमुळे तो वादत सापडला असून त्याच्यावर कारवाईची टांगती तलवारही लटकत आहे. सोशल मीडियावर वरूण धवनचे काही व्हिडीओ व्हायरल झाले असून त्यामध्ये तो प्रवासादरम्यान मेट्रो ट्रेनमध्ये पुल-अप्स करताना दिसला आहे. नियमांचे उल्लंघन केल्यामुळेच तो मोठ्या वादात अडकला आहे.
मुंबई मेट्रोत पुल-अप्स काढण पडलं भारी
सध्या वरूण धवनचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही शनिवारची घटना आहे. मुंबईच्या प्रचंड ट्राफिकमधून वाचण्यासाठी वरूण धवनने मेट्रोतून प्रवास करण्याचा मार्ग स्वीकारला आणि तो अचानक एक थिएटरमध्ये पोहोचला. वरूणने मेट्रोच्या आतूनच एक व्हिडीो शेअर करत चाहत्यांना विचारलं की ते ( चित्रपट पहायला) कोणत्या सिनेमा थिएटरमध्ये जात आहेत ? त्यानंतर थोड्याच वेळात सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ समोर आला, ज्यामध्ये वरूण धवन हा मेट्रो ट्रेनमध्ये उभा राहून आत असलेल्या लोखंडी रॉडवर लटकून व्यायाम करताना दिसला. त्याने पुल-अप्सही काढले. तेव्हा त्याच्या आजूबाजूला इतरही काही प्रवासी होते.
मुंबई मेट्रोने दिला कारवाईचा इशारा ?
यानंतर, मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (MMMOCL) ने तोच व्हिडिओ त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला असून एक सेफ्टी मेसेजही जारी केला. त्यामध्ये त्यांनी वरूण धवनला टॅग करत एक कॅप्शनही लिहीली होती.
” तुझ्या ॲक्शन मूव्हीप्रमाणे या व्हिडीओसोबतही एक डिस्क्लेमर लावायला हवा होता, वरूण धवन. कृपया मुंबई मेट्रोमध्ये हे (स्टंट) करू नका. मित्रांसोबत मेट्रोने प्रवास करणे छान असते हे आम्हाला माहिती आहे, पण हे हँडल्स लटकण्यासाठी बनवलेले नाहीत. मेट्रोमधील पकडण्यासाठी असलेली हँडल्स ही लटकण्यासाठी नव्हे तर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी असतात. अशा प्रकारची कृत्ये केवळ धोकादायकच नाहीत, तर इतर प्रवाशांना त्रासदायक ठरू शकतात ” असे त्यात नमूद करण्यात आलं.
“महामुंबई मेट्रो प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, मेट्रोमध्ये अशा प्रकारची स्टंटबाजी किंवा गैरवर्तन करणे Metro Railways (Operations and Maintenance) Act, 2002 अंतर्गत गुन्हा ठरू शकतो. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव निर्माण करणे किंवा मालमत्तेचे नुकसान करणे या कलमांखाली संबंधितांवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार दंडासोबतच कारावासाची शिक्षाही होऊ शकते. म्हणूनच, प्रवाशांनी मेट्रोमध्ये प्रवास करताना मजा करा, मित्रांसोबत वेळ घालवा — पण हँडल्सला लटकून धोकादायक कृत्यं करू नका. महामुंबई मेट्रोमध्ये जबाबदारीने आणि सुरक्षितपणे प्रवास करा’ असे आवाहन मेट्रोच्या या पोस्टच्या माध्यमातून करण्यात आलं आहे.
This video should have come with a disclaimer like the ones in your action movies, @Varun_dvn –
Do Not Try This On Maha Mumbai MetroWe get it, it is cool to hang out with friends inside our metros but those grab handles are not for hanging.
Acts like these are punishable… pic.twitter.com/XiCP8OF8wT
— Maha Mumbai Metro Operation Corporation Ltd (@MMMOCL_Official)
वरूण झाला ट्रोल, प्रशासनाचं कौतुक
या पोस्टनंतर, अनेक सोशल मीडिया युजर्सनी मेट्रो प्रशासनाचे कौतुक केलं. सेलिब्रिटी असूनही, नियम तोडल्याबद्दल वरूणला फटकारण्यात आले, हे एक योग्य पाऊल आहे असं अनेकांनी म्हटलं. अनेकांवी वरूणला या स्टंटबद्दल ट्रोलही केलं.
दरम्यान, 23 जानेवारी रोजी प्रदर्शित झालेला वरुण धवनचा “बॉर्डर 2” बॉक्स ऑफिसवर तूफान कामगिरी करत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत 140 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे. या चित्रपटात वरुणसोबत सनी देओल, दिलजीत दोसांझ आणि अहान शेट्टी यांच्या भूमिका आहेत. मोना सिंग, सोनम बाजवा, अनन्या सिंग आणि मेधा राणा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. अनुराग सिंगने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट जेपी दत्ता यांच्या 1997 च्या सुपरहिट चित्रपट ‘बॉर्डर’चा सिक्वेल आहे.