'तो माझा पास्ट' बिग बॉसच्या घरात बॉयफ्रेंडसाठी अश्रू, बाहेर पडताच राधा पाटीलचा सूर बदलला, म्हणाली..
abp majha web team January 27, 2026 09:43 PM

Bigg Boss Marathi 6 Radha Patil: ‘बिग बॉस मराठी 6’मधून पहिल्याच आठवड्यात बाहेर पडलेली लावणी नृत्यांगना राधा पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. बिग बॉसच्या घरात राधाने आपल्या बॉयफ्रेंड विषयी काही गोष्टी उघड केल्या होत्या.  घरात असताना ज्या बॉयफ्रेंडबद्दल ती भावूक होत होती, त्याच नात्याबाबत आता घराबाहेर येताच राधाने पूर्णपणे वेगळी भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात असताना राधा अनेकदा आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसली होती. अनुश्री मानेसोबत गप्पा मारताना तिने आपल्या रिलेशनशिपचे तपशीलही उघड केले होते. ती सांगत होती की, ती गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. इतकंच नव्हे तर, तीन वर्षात तो स्वतःच्या हाताने कधीही जेवला नाही. मी कायम त्याला माझ्या हाताने भरवते. असं म्हणत भावूक झालेली दिसली. मात्र, घरातून बाहेर पडताच चित्र पूर्णपणे बदललेलं दिसत आहे. 

काय म्हणाली राधा? 

राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान जेव्हा राधाला तिच्या बॉयफ्रेंडबद्दल प्रश्न विचारण्यात आलं, तेव्हा तिने थेट “तो माझा भूतकाळ आहे,” असं म्हणत सर्वांनाच धक्का दिला. राधाच्या म्हणण्यानुसार, घरातील तिच्या बोलण्याचे काही व्हिडीओ क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाले, पण त्याचा अर्थ लोकांनी चुकीचा काढला. आपण आधीच एका पॉडकास्टमध्ये सध्या कोणत्याही नात्यात नसल्याचं स्पष्ट केलं होतं, असंही तिने सांगितलं.

राधा म्हणाली" बिग बॉसच्या घरात मी जे बोलले ते मी केलं नाही असं नाही. पण तो माझा पास्ट आहे. खरंतर आम्ही एक तासापासून गप्पा मारत होतो. पण त्यातल्या काहीच गोष्टी कट होऊन आल्या आहेत. मी आधीच एका पॉडकास्ट मध्ये सांगितलं होतं की मी आता कोणत्याही नात्यात नाही. मी अजूनही तेच सांगेन. की तो माझा भूतकाळ होता. खरंतर अनुश्री तिच्या नात्याविषयी मला सांगत होती आणि मग मी माझ्या नात्याविषयी सांगितलं. पण तिचं चर्चेत आलं नाही. माझ्या रिलेशनशिपची खूप चर्चा झाली. त्यावर रिल्स बनवल्या गेल्या." असं राधा म्हणाली.

नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण

राधाच्या या यू-टर्नमुळे नेटकऱ्यांमध्ये चर्चेला उधाण आलं आहे. घरात असताना ज्या व्यक्तीसाठी ती इतकी भावनिक झाली होती, तो जर भूतकाळ होता, तर मग इतकं भावूक होण्यामागचं कारण काय, असा सवाल अनेकजण विचारत आहेत. काहींना वाटतंय की प्रसिद्धी मिळवण्यासाठी हा बदललेला सूर आहे, तर काहींच्या मते घराबाहेर आल्यानंतर परिस्थिती वेगळी असू शकते. राधाने कधीही आपल्या जोडीदाराचं नाव उघड केलं नाही. मात्र, त्याच्या स्वभावाबद्दल, सवयींबद्दल ती घरात भरभरून बोलत होती. आता मात्र त्याच नात्याला ‘पास्ट’ म्हणत असल्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.