आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 7 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेला मोजून 10 दिवस बाकी आहेत. अशात आपल्या संघाला टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावणाऱ्या स्टार खेळाडूने क्रिकेटला कायमचा अलविदा केला आहे. या खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत आपण निवृत्त होत असल्याचं जाहीर केलंय. हा खेळाडू नक्की कोण आहे? तसेच त्याने कोणत्या साली टी 20i वर्ल्ड कप जिंकून देण्यात योगदान दिलं होतं? हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.
टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असतानाच ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज केन रिचर्डसन याने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतलाय. ऑस्ट्रेलियाने 2021 साली टी 20i वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. रिचर्डसन त्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचा भाग होता. मात्र रिचर्डसन याला 10 व्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेसाठी (Icc T20i World Cup 2026) ऑस्ट्रेलिया संघात संधी मिळाली नाही. रिचर्डसन याने ऑस्ट्रेलियाचं 36 टी 20i आणि 25 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलं. रिचर्डसन याने ऑस्ट्रेलियासाठी वनडेत 39 आणि टी 20i क्रिकेटमध्ये 45 विकेट्स मिळवल्या .
रिचर्डसन गेल्या अनेक महिन्यांपासून ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीममधून बाहेर होता. रिचर्डसन याला अनेक महिने संधीच मिळाली नाही. रिचर्डसन याने अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना हा टीम इंडिया विरुद्ध 2023 साली खेळला होता. त्यामुळे रिचर्डसन लवकरच निवृत्ती जाहीर करणार असल्याचं निश्चित म्हटलं जात होतं. त्याप्रमाणे रिचर्डसन याने बीबीएलच्या 15 व्या हंगामातील अंतिम सामन्यानंतर निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. रिचर्डसन याने स्पर्धेतील 15 व्या मोसमात सिडनी सिक्सर्सचं प्रतिनिधित्व केलं. मात्र रिचर्डसनला फक्त 2 सामनेच खेळण्याची संधी मिळाली.
केनने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आधी निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेटर्स असोसिएशनकडून प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं. रिचर्डसनने या प्रसिद्धीपत्रकाद्वारे भावना व्यक्त केल्या.
“मी बीबीएलच्या समारोपासह व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं जाहीर करु इच्छितो. मी 2009 साली पदार्पणापासून ते आतापर्यंत आयुष्यातील प्रत्येक क्षण भरभरुन जगलोय, आणि आता या प्रवासाची सांगता करण्याची ही योग्य वेळ आहे. माझ्या कारकीर्दीच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या सर्व प्रक्षिशक, प्रशासकांचा आणि सहकारी खेळाडूंचा आभारी आहे”, अशा शब्दात रिचर्डसन याने अनेक वर्षांच्या कारकीर्दीतील आठवणींना उजाळा देत सर्वांचे जाहीर आभार मानले.