ड्राय फ्रूट्स आरोग्यासाठी फायदेशीर मानले जातात. बदाम, अक्रोड, पिस्ता, काजू आणि किशमिश यांसारख्या ड्राय फ्रूट्समध्ये निरोगी फॅट्स, विटामिन्स, फायबर आणि शरीरासाठी आवश्यक पोषक तत्वे भरपूर असतात. पण यापैकी एक ड्राय फ्रूट विशेषतः हृदय आणि मेंदूसाठी अत्यंत फायदेशीर मानले जाते. ते नियमित खाल्ल्याने वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी होण्यास मदत होते – हे LDL धमन्यांमध्ये अडथळा निर्माण करून हार्ट अटॅकचा धोका वाढवते. त्याचबरोबर चांगले कोलेस्ट्रॉल (HDL) वाढवण्यासही ते उपयुक्त ठरते.
सीडीसीच्या मते, अमेरिकेत सुमारे एक तृतीयांश लोकांच्या रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असते. हाय कोलेस्ट्रॉलमुळे हार्ट अटॅक, इतर हृदयरोग आणि स्ट्रोकचा धोका अनेक पटींनी वाढतो. २०१६ मध्ये सॅन डिएगो, कॅलिफोर्नियातील वैज्ञानिकांनी अभ्यास केला. त्यात असे आढळले की, रोज अक्रोड खाल्ल्याने शरीराचे वजन न वाढवता कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर सकारात्मक परिणाम होतो. संशोधकांनी सरासरी ६९ वर्षे वयाच्या ५१४ ज्येष्ठ व्यक्तींच्या डेटाचा अभ्यास केला. त्यात दिसले की, एक वर्ष सातत्याने रोज अक्रोड खाणाऱ्यांचे LDL कोलेस्ट्रॉल लक्षणीयरीत्या कमी झाले होते.
अक्रोड सुक्या स्वरूपात किंवा पाण्यात भिजवून खाता येतात. मात्र, रोज सकाळी रिकाम्या पोटी २ भिजवलेले अक्रोड खाणे ही सर्वात निरोगी आणि प्रभावी सवय मानली जाते. यामुळे अक्रोडमधील पोषक तत्वांचे शोषण उत्तम होते आणि फायदे झटपट मिळतात. अक्रोडमध्ये फायबर असल्याने पोट भरलेले राहते आणि लवकर भूक लागत नाही.
(टीप: या लेखात दिलेल्या सूचना केवळ सामान्य माहितीसाठी आहेत. आरोग्याशी संबंधित कोणताही व्यायाम, आहारातील बदल किंवा आजारांवरील उपाय करण्यापूर्वी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या. टीव्ही9 मराठी कोणत्याही दाव्याची शास्त्रीय पुष्टी करत नाही.)