न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत भारताने जबरदस्त कामगिरी केली आहे. पाच सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका खिशात टाकली आहे. त्यामुळे भारताचं पारडं टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी जड झालं आहे. या मालिकेत सूर्यकुमार यादवलाही सूर गवसला आहे. पण संजू सॅमसनचा फॉर्म चिंतेचा विषय ठरला आहे. असं असताना संजू सॅमसनला प्लेइंग 11 मधून बाहेर काढलं जाईलं असं बोललं जात होतं. पण चौथ्या टी20 सामन्यासाठी प्लेइंग 11 जाहीर होताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण या प्लेइंग 11 मधून फॉर्मात असलेल्या इशान किशनला बसवण्यात आलं आहे. तसेच संजू सॅमसनवर विश्वास टाकला आहे. इशान किशनला बसवण्याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न समोर येत आहे. पण सूर्यकुमार यादवने याबाबत स्पष्ट काय ते सांगून टाकलं. तिसऱ्या टी20 सामन्यात इशान किशनला दुखापत झाली होती. त्यामुळे या सामन्यात खेळत नसल्याचं त्याने सांगितलं.
इशान किशनने या मालिकेतील पहिल्या सामन्यात खास काही केलं नव्हतं. पण मागच्या दोन सामन्यात जबरदस्त खेळी केली. त्याने रायपूरमध्ये झालेल्या दुसर्या सामन्यात 76 धावा केल्या. तर गुवाहाटीत झालेल्या सामन्यात 28 धावांची खेळी केली. या दोन खेळीमुळे संजू सॅमसनचं संघातील स्थान डळमळीत झालं. कारण संजू सॅमसन मागच्या तिन्ही सामन्यात फेल गेला होता. त्यामुळे त्याला या सामन्यात बसवलं जाईल अशी चर्चा होती. पण तसं झालं नाही. इशान किशन जखमी असल्याने संजू सॅमसनला सिद्ध करण्यासाठी आणखी एक संधी मिळाली आहे. आता या सामन्यात संजू सॅमसन काही करू शकला नाही तर खूपच कठीण होईल. त्यामुळे संजू सॅमसनवर दडपण असणार आहे.
टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेपूर्वी सराव सामने पार पडणार आहेत. यात तिलक वर्माची एन्ट्री होणार यात काही शंका नाही. त्यामुळे या संघात एक जागा रिकामी करणं भाग पडणार आहे. त्यामुळे रिंकु सिंह किंवा रवि बिश्नोई यापैकी एकाला बसवावं लागेल. तर संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्यापैकी एकाला कामगिरीच्या आधारावर प्लेइंग 11 मध्ये जागा मिळेल.