अनेकांची स्वप्नं पूर्ण केली, पण अजितदादांची दोन स्वप्नं अपूर्णच राहिली; वेळेआधीच एक्झिटने महाराष्ट्र सुन्न
एबीपी माझा ब्युरो January 29, 2026 01:13 AM

मुंबई: एखाद्या कार्यकर्त्याला नगरसेवक व्हायचं असतं, नगरसेवक झालं की नगराध्यक्ष व्हायचं असतं. नगराध्यक्ष झालं की आमदार व्हायचं असतं. आमदार झालं की मंत्री बनायचं असतं अन् मंत्री झाले की मुख्यमंत्री. एकंदरीतच काय तर राजकारणात आलेल्यांना भविष्यात मोठमोठ्या पदांवर जाण्याची इच्छा ही असतेच. गेली चार दशकं राजकारणात वावरणाऱ्या अजित पवारांचीही बरीच स्वप्नं होती. मात्र बारामतीमध्ये येत असताना अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला अन् त्यात त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेनंतर अजित पवारांची स्वप्नंही अधुरीच राहिली.

मतदारसंघातला असो किंवा मतदारसंघाच्या बाहेरचा, ज्याचा मुद्दा पटला त्याचं काम करून देणारा नेता म्हणजे अजितदादा. अनेकांच्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरवणारे अजितदादा... मात्र अजित पवारांची स्वतःची काही स्वप्नं अपूर्णच राहिली. त्यापैकी पहिलं स्वप्न म्हणजे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचं.

मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न अपूर्ण

जे पोटात तेच ओठावर.... हा अजित पवारांचा स्वभाव. त्यामुळे अजित दादाच्या मनातली स्वप्नं महाराष्ट्रापासून कधी लपून राहिली नाहीत. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनणं हे त्या यादीतलं सर्वात पहिलं स्वप्न. मात्र मुख्यमंत्रिपदानं वारंवार हुलकावणी दिल्यानं अजितदादा विरोधकांच्या खिल्लीचा विषयही बनले. पण अजितदादांनी त्याला ना थारा दिला, ना त्याचं मनाला लावून घेतलं. 

सन 2004 साली जेव्हा मुख्यमंत्रिपदाची संधी आली, तेव्हा मात्र, शरद पवारांनी मुख्यमंत्रिपदाचा मान काँग्रेसला दिला. पण, दुसरीकडे दादांनी उपमुख्यमंत्रिपदाचा विक्रम मात्र मोडून काढला. राज्याचे मुख्यमंत्री बदलत राहिले, पण उपमुख्यमंत्री अजित पवार कायम राहिले.

राष्ट्रवादीचे एकीकरणाचं स्वप्न अपूर्ण

हल्ली तर राज्यात दादांचा दौरा लागला की, भावी मुख्यमंत्री म्हणून दादांचा बॅनर फिक्स होता. पण, नियतीला हे मान्य नव्हतं. जसं दादांचं मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न अधुर राहिलं, तसं राष्ट्रावादीचे वेगळे झालेले दोन संसार एक करण्याचंही स्वप्नही अजितदादा मागे सोडून गेलेत. 

राष्ट्रवादी दोन झाल्या होत्या, पण पवारांच्या कुटुंबात ओलावा कायम होता. महापालिकांच्या निवडणुकांपुरत्या पुणे-पिंपरीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढल्या. दोन्ही राष्ट्रवादीच्या मनोमिलनासाठी सर्वात जास्त आग्रही होते अजित पवार. तसे जाहीर संकेतही त्यांनी वेळोवेळी दिले होते. 

अजितदादांच्या हयातीत राष्ट्रवादी दुभंगली, मात्र दोन्ही राष्ट्रवादीचं सर्वार्थानं मनोमिलन होण्याआधीच अजितदादांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांचं हे स्वप्नही अधूरच राहिलं. 

ही बातमी वाचा:

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.