टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील चौथ्या टी 20I सामन्याचं आयोजन हे विशाखापट्टणममधील एसीए-व्हीडीसीए स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. सामन्याला संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. भारताच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने फिल्डिंगचा निर्णय घेत न्यूझीलंडला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. तसेच दोन्ही संघांकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये बदल करण्यात आला आहे. टीम इंडिया आणि न्यूझीलंडने कुणाला संधी दिलीय आणि कुणाला बाहेर केलंय? हे जाणून घेऊयात.
टीम इंडियाकडून प्लेइंग ईलेव्हनमध्ये 1 बदलटीम इंडियाला प्लेइंग ईलेव्हनमध्ये नाईलाजाने बदल करावा लागला आहे. मॅचविनर फलंदाज इशान किशन याला नाईलाजाने बाहेर व्हावं लागलं आहे. इशानला किरकोळ दुखापतीमुळे या सामन्याला मुकावं लागल्याची माहिती कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली.
सूर्या काय म्हणाला?“ईशान किशन याला मागील सामन्यात किरकोळ दुखापत झाली होती. त्यामुळे इशानच्या जागी अर्शदीप सिंह याचा समावेश करण्यात आला आहे. तर अक्षर पटेल याला दुखापतीतून सावरण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल. त्यामुळे अक्षर पाचव्या सामन्यात खेळेल अशी आशा आहे”, असं सूर्याने सांगितलं.
अक्षरला नागपूरमधील न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या टी 20i सामन्यात आपल्याच बॉलिंगवर दुखापत झाली होती. अक्षरच्या बोटाला बॉलचा फटका लागला होता. त्यामुळे अक्षरच्या बोटातून रक्त निघालं होतं. तेव्हापासून अक्षरला 3 सामन्यांना मुकावं लागलं आहे.
न्यूझीलंड टीम इंडियाला विजयी चौकारापासून रोखणार?दरम्यान टीम इंडियाने न्यूझीलंड विरुद्धची 5 सामन्यांची मालिका आपल्या नावावर केली आहे. टीम इंडिया या मालिकेत 3-0 अशा एकतर्फी फरकाने आघाडीवर आहे. भारताने नागपूर, रायपूर आणि गुवाहाटीतील सामन्यात न्यूझीलंडवर मात केली. आता टीम इंडियाचा सलग चौथा विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे न्यूझीलंड टीम इंडियाला रोखून विशाखापट्टणममध्ये विजयाचं खातं उघडणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, हर्षित राणा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराह.
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टीम सायफर्ट (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनव्हे, रचिन रवींद्र, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमॅन, डॅरिल मिशेल, मिचेल सँटनर (कर्णधार), झॅक्री फाउल्क्स, मॅट हेन्री, ईश सोढी आणि जेकब डफी.