चिपळूण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत
esakal January 29, 2026 07:45 AM

चिपळूण शहराचा पाणीपुरवठा सुरळीत
रात्री उशिरापर्यंत काम ; मुरादपूरमध्ये टॅंकरनेच पाणी
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. २८ ः शहरातील खेंड, कांगणेवाडी, गोवळकोट व पेठमाप या भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम रात्री उशिरा पूर्ण झाले. त्यामुळे आजपासून या भागाला सुरळीत पाणीपुरवठा सुरू झाला आहे. मुरादपूर भागाला मात्र अजूनही टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
शहरातील खेंड, कांगणेवाडी, गोवळकोट व पेठमाप या भागांना पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन मंगळवारी सकाळी गुहागर बायपास रोड येथे मुंबई–गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामा दरम्यान फुटली. या घटनेमुळे संबंधित भागातील नागरिकांचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण निर्माण झाली होती. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पालिकेने या भागातील नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला.
महामार्गचे काम करणाऱ्या चेतक कंपनीकडून २० हजार लिटर क्षमतेचा एक टँकर उपलब्ध करून घेण्यात आला, तर पालिकेचे दोन टँकरही तात्काळ कार्यरत करण्यात आले. ज्या भागात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद होता, त्या ठिकाणी प्राधान्याने टँकर पाठवून नागरिकांची गैरसोय टाळण्यात आली. पाणीपुरवठा सभापती निहार कोवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्यांनी मंगळवारी रात्री ११ वाजेपर्यंत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. त्यामुळे आज सकाळी या भागाचा पाणीपुरवठा सुरळीत झाला. मुरादपूर परिसरात पाईपलाईन शिफ्टिंगसाठी शटडाऊन असल्याने बुधवारी सुद्धा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. उक्ताड परिसरात सध्या कमी दाबाने अर्धा-अर्धा तास पाणीपुरवठा सुरू आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.