Ajit Pawar plane crash : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय वर्तुळातही मोठी पोकळी निर्माण झाली आहे. काल झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचे निधान झाले. यानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. आज बारामतीत शासकीय इतमामात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखोंचा जनसागर अजितदादांना अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होता. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सर्वच प्रमुख नेत्यांनी खासदार सुनेत्रा पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
आमदार जयंत पाटील, अनिल देशमुख, हर्षवर्धन पाटील, शशिकांत शिंदे या सगळ्या नेत्यांनी खासदार सुनेत्र पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर काँग्रेस आमदार सतेज पाटील यांनी देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. त्याचबरोबर धैर्यशील मोहिते पाटील यांनी देखील सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सर्वच मोठे नेते उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आज बारामतीमधील विद्या प्रतिष्ठानमध्ये हजारोंच्या साक्षीनं अखेरचा निरोप देण्यात आला. काल बुधवारी बारामती विमानतळाजवळ धावपट्टीपासून अवघ्या 100 मीटर अंतरावर विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अजित पवारांच्या अंत्यसंस्कारादरम्यान "अजितदादा अमर रहे" चा अखंड जयघोष करण्यात आल्या त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नि दिला. गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजप प्रमुख नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे प्रमुख राज ठाकरे, यांच्यासह अनेक नेते अंत्यसंस्काराला उपस्थित होते.
अजितदादांच्या अंत्यविधीला लोटलेली हजारो कार्यकर्ते चाहत्यांची गर्दी ही त्यांनी कमावलेली होती. अजितदादा या जगातून गेलेच नाहीत अशा भावना कार्यकर्त्यांच्या होत्या. अजूनही कार्यकर्ते निःशब्द आहेत. त्यांना अजूनही सुचत नाहीये. राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी पक्षासाठी मोठा यक्ष प्रश्न निर्माण होणार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याचा मनात पोरका झालो असल्याची भावना आहे. सगळं संपल्यासारखं वाटतंय. दादा आधारस्तंभ होते. असा एकमेव नेता होता दर मंगळवारी आम्हाला बोलवायचे. आमच्या समस्या ऐकायचे. आमच्या मतदारसंघाच्या प्रत्येक कामाची वीट त्यांनी रचली आहे. काय करणार आम्ही आता? कुणाकडे बघणार अजून. आमच्या दृष्टीने आता सगळं संपलं आहे. असा दिवस कधी बघायला मिळेल असा आयुष्यात कधी विचार केला नव्हता. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते देत आहेत.