Mayra Vaikul: झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधून घराघरात पोहोचलेली बालकलाकार मायरा वायकूळ पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनयासोबतच सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असणारी मायरा, ट्रेंडिंग रील्स आणि व्हिडीओंसाठी ओळखली जाते. मात्र, सध्या तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक दिसेनासं झाल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
मायरा लहान वयापासूनच सोशल मीडियावर रील्स तयार करत होती. याच माध्यमातून तिची ओळख निर्माण झाली आणि पुढे तिला ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेत परीची भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या मालिकेत तिनं प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबत काम केलं होतं. मालिकेनंतर मायरा ‘मुक्काम पोस्ट -देवाचं घर’ या मराठी सिनेमातही मुख्य भूमिकेत झळकली.दरम्यान, तिचं इन्स्टाग्राम अकाऊंट बंद झालं आहे की तात्पुरतं डिऍक्टिव्ह करण्यात आलं आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. हे अकाऊंट पालकांनी बंद केलं की इतर काही कारण आहे, याबद्दलही स्पष्टता नाही.
दरम्यान, मायरा पुन्हा एकदा श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांच्यासोबत मोठ्या पडद्यावर दिसणार आहे. श्रेयस तळपदेच्या वाढदिवसानिमित्त जाहीर झालेल्या ‘मर्दिनी’ या नव्या सिनेमात ती भूमिका साकारणार आहे. सिनेमाच्या घोषणेसाठी शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये संपूर्ण टीमला टॅग करण्यात आलं होतं, मात्र मायराचं अकाऊंट दिसत नसल्याचं चाहत्यांच्या लक्षात आलं. त्यामुळेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटबाबत चर्चा अधिक रंगली आहे. सध्या मायराच्या अकाऊंटबाबतची उत्सुकता कायम असून तिच्या चाहत्यांना लवकरच अधिकृत खुलाशाची अपेक्षा आहे.
मायराच्या धाकट्या भावाचं व्योमचं इन्स्टाग्राम प्रोफाइलही सध्या शोधूनही सापडत नाहीये. त्यामुळे सोशल मीडियावर चर्चा अधिकच वाढली आहे. दरम्यान, मायराची आई श्वेता वायकुळ यांनी काल व्योमच्या बोरन्हानाचा एक व्हिडिओ शेअर केला. मात्र, या पोस्टमध्ये त्यांनी मायरा किंवा व्योम यांना टॅग केलेलं दिसत नाही. यामुळे दोघांची अकाऊंट्स जाणूनबुजून बंद करण्यात आली आहेत की काही तांत्रिक कारण आहे, असा प्रश्न चाहत्यांमध्ये निर्माण झाला असून यावरून अनेक तर्क लावले जात आहेत.