हिंदी प्रोडक्शन हाऊसकडून नटरंग अभिनेत्रीला आला धक्कादायक अनुभव; विभावरीने सगळंच सांगितलं? पोस्ट शेअर
भाग्यश्री कांबळे January 29, 2026 08:13 PM

Vibhavari Deshpande shares shocking Bollywood experience: उल्लेखनीय कामगिरीतून मराठी अभिनेत्री विभावरी देशपांडे घराघरात पोहोचली. ती सोशल मीडियात प्रचंड सक्रीय असते. तिचे पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतात. विभावरीनं आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.  अलिकडेच तिची हिंदी प्रोजेक्टसाठी निवड करण्यात आली होती. मात्र, तिच्या नकळत हिंदी चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले. तिनं हा धक्कादायक अनुभव एका पोस्टच्या माध्यमातून शेअर केला. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहे. 

विभावरीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, "गेल्या वर्षी एका हिंदी प्रोजेक्टसाठी  माझी निवड करण्यात आली होती. हा हिंदी प्रोजेक्ट एका नावाजलेल्या दिग्दर्शकाचा होता. ऑडिशनशिवाय मला रोल ऑफर करण्यात आला होता.  याविषयी माझं दिग्दर्शकासोबत बोलणंही झालं. डिसेंबर 2025 मध्ये या चित्रपटाचं शूटिंग सुरू होणार अशी माहिती मला मिळाली.  पुढची चर्चा करण्यासाठी प्रोडक्शन हाऊसमधून फोन येईल, असं मला सांगण्यात आलं".

"नंतर माझ्या ऐकण्यात आलं की, या हिंदी चित्रपटाचं अर्धे शूटिंग आधीच पूर्ण झाले आहे. हे ऐकून मला शॉक बसला.  चित्रपटात रिप्लेस करणं ही काही मोठी गोष्ट नाही. पण साधी कल्पना न देणं किती अव्यावसायिक आहे.  मला पुर्णपणे जाणीव आहे मी काही मोठी स्टार नाही.  मला हे देखील माहित आहे की, अभिनय हे स्वतंत्र काम आहे. पण जे काही आता घडलं ते अनादरपूर्ण आणि अव्यावसायिक आहे.  आपण आपल्या आयुष्यात अपमान आणि दु:ख पचवत असतो.  आपण असंही म्हणतो की, इंडस्ट्री ही अशीच चालते.  आपण आयुष्यात पुढे जात असतो. प्रत्येक अपमानाने आपण अधिक मजबूत होत असतो.  परंतु, लहान असो किंवा मोठा, प्रत्येक कलाकार आदरास पात्र आहे", असं विभावरीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

"आपण  अनादर, असंवेदनशील आणि अव्यावसायिक वर्तनाला सामान्य तर बनवत नाही आहोत ना..? साधं संवाद अपेक्षित करणं चुकीचं आहे का? मी या ठिकाणी कुणाचंही नाव घेणार नाही. कारण मला काम मिळणार नाही, याची भीती अजिबात नाही. माझी ही पोस्ट कुणाचीही बदनामी करण्यासाठी नाही. माझ्यासोबत घडलेली घटना सांगितली, माझे विचार मी मांडले.  माझ्या अनेक सहकाऱ्यांनी आतापर्यंत याहून वाईट अनुभव सहन केले आहे.  बाकी सगळं काही  फर्स्ट क्लास आहे..." असं अभिनेत्रीनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.