पहाटे सहालाच अजित पवारांचा डॉक्टरांना फोन; जखमी शेतकऱ्यांसाठी हॉस्पिटलमध्ये थांबून आस्थेने केली होती विचारपूस!
esakal January 29, 2026 10:46 PM

नगर तालुका: ‘‘हॅलो डॉक्टर, मी अजित पवार बोलतोय...तुम्ही हॉस्पिटलला येऊ शकता का?’’ असा पहाटे सहा वाजताचा फोन मॅककेअर हॉस्पिटलचे संचालक डॉ. सतीश सोनवणे यांना आला आणि अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत सर्व डॉक्टर हॉस्पिटलमध्ये हजर झाले.

Minister Mkarand Patil: महाराष्ट्राच्या कामाचा माणूस...

शेवगाव तालुक्यातील घोटण येथे १५ नोव्हेंबर रोजी ऊसदर आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात गंभीर जखमी दोन शेतकऱ्यांवर नगर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. या जखमी शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पहाटे सहा वाजताच तत्परतेने रुग्णालयात दाखल झाले होते. रुग्णालयात पोहोचल्यानंतर अजित पवार यांनी हॉस्पिटलमधून संचालक डॉ. सोनवणे यांना फोन करून तातडीने येण्याची विनंती केली. त्यानंतर काही वेळातच सर्व डॉक्टर हॉस्पिटलमध्ये पोहोचले.

यावेळी अजित पवार यांच्यासह आमदार संग्राम जगताप उपस्थित होते. अजित पवार यांनी सुमारे दीड तास रुग्णालयात थांबून जखमी शेतकरी, त्यांच्या नातेवाईकांची आस्थेवाईक विचारपूस केली. उपचारांबाबत सविस्तर माहिती घेत वैद्यकीय यंत्रणेशी संवाद साधत त्यांनी एका संवेदनशील राजकीय नेतृत्वाचे दर्शन घडवले.

रुग्णालयातून निघताना अजित पवार यांनी जखमी शेतकऱ्यांना, औषधोपचाराच्या खर्चाची कोणतीही चिंता करू नका, लवकर बरे व्हा, असे सांगत हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च आमदार संग्राम जगताप करतील, अशी सूचना केली. त्यानुसार आमदार जगताप व हॉस्पिटल प्रशासनाने उपचारांचा सर्व खर्च उचलला. विशेष म्हणजे रुग्ण बरे होऊन डिस्चार्ज मिळाल्यानंतरही अजित पवार यांनी हॉस्पिटल प्रशासनाचे चांगल्या उपचारांसाठी आभार मानले, अशी आठवण डॉ. सोनवणे, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. आनंद काशीद व डॉ. मोहम्मद माजीद यांनी व्यक्त केली.

Sanjay Mama Shinde: दिवाळी पाडव्याला अजितदादांची भेट ठरलेलीच; संजयमामा शिंदेंकडून आठवणींना उजाळा

घोटण येथील आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पोलिसांत झालेल्या संघर्षात गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेतील जखमी शेतकऱ्यांसाठी अजित पवार यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.