Zakir Khan Revealed Reason Why Took Break From Comedy: सुप्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खाननं (Comedian Zakir Khan) काही दिवसांपूर्वीच आपण कॉमेडीमधून ब्रेक घेत असल्याचं जाहीर केलं. त्यावेळी त्यानं आपल्या आजारपणाचा हवाला दिला. झाकीरनं व्हिडीओमध्ये बोलताना सांगितलं की, तो त्याच्या आरोग्याला प्राधान्य देऊ इच्छितो. सुप्रसिद्ध कॉमेडियन झाकीर खान (Zakir Khan) कॉमेडीमधून ब्रेक घेत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि त्याचे चाहते निराश झाले. झाकीरनं अचानक घेतलेल्या निर्णयामुळे सर्वांना धक्का बसला. पण, त्यानं आधीच याचे संकेत दिले होते. झाकीरनं साधारणतः सप्टेंबर 2025 मध्ये पहिल्यांदा ब्रेक घेत असल्याचा उल्लेख केलेला. अशातच आता त्यानं नुकत्याच गल्फ न्यूजला दिलेल्या मुलाखतीत कॉमेडीतून ब्रेक घेण्याचं कारण सांगितलं आहे.
एका मुलाखतीत बोलताना झाकीर खान म्हणाला की, "मला काही आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यातील काही जेनेटिक आहेत. मला माझ्या आरोग्याची काळजी घ्यायचीय. माझ्या कुटुंबामध्ये काही जेनेटिक आजार आहेत. एका वयानंतर ते आजार उद्भवू लागतात. याशिवाय मी स्वत: देखील माझ्या शरीराचं खूप नुकसान करून घेतलंय. फक्त दोन तास झोपतो आणि नंतर हजारो लोकांना भेटायला जातो. कारण जेव्हा तुम्ही एखाद्या शहरात जाता. त्यानंतर लगेचच लोकांना भेटणं सुरू होतं..."
View this post on Instagram
"माझ्या कुटुंबात एवढं यश कुणालाच मिळालेलं नाही. त्यामुळे माझ्यावर येणाऱ्या पुढील पिढींचीही जबाबदारी आहे. यामुळे मी जवळपास 10 वर्ष फक्त कामाला माझी प्रायोरिटी मानत होतो. पण, त्यामुळे माझ्या तब्येतीवर गंभीर परिणाम झाला. सुरुवातीला मला वाटलं होतं की, कामासोबत मी या गोष्टी सांभाळून घेईन. पण, जेव्हा मी गेल्या वर्षी अमेरिकेला गेलो. तेव्हा मला जाणीव झाली की, या दोन्ही गोष्टी एकत्र सांभाळणं कठीण आहे. त्यामुळेच मी ब्रेक घेण्याचा निर्णय घेतलाय...", असंही त्यानं पुढे सांगितलं.
झाकीर खाननं व्हायरल क्लिपचाही उल्लेख केला आहे. ज्यामध्ये त्यानं सांगितलं होतं की, तो 2030 पर्यंत स्टँड-अप कॉमेडीपासून दूर राहील. त्यानं स्पष्ट केलं की, "मी हे विशेषतः हैदराबादसाठी नमूद केलं आहे. जेव्हा मी ब्रेक घेतो आणि पुन्हा काम सुरू करतो, तेव्हा हैदराबादला परत येण्यासाठी वेळ लागेल. पण ब्रेक इतका जास्त काळ राहणार नाही." पुढे बोलताना तो म्हणाला की, "मी शक्य तितकं निरोगी राहण्याचा प्रयत्न करेन. मी त्यावर काम करेन. मला स्टँड-अप खूप आवडतं आणि मला 80 व्या वर्षीही ते करायचंय. आणि ते करणं गरजेचंही आहे..." गेल्या वर्षी, झाकीर खाननं इंस्टाग्रामवर शेअर केलं होतं की, तो एका वर्षापेक्षा जास्त काळ आजारी होता, पण त्यावेळी ते आवश्यक वाटलं म्हणून तो काम करत राहिला. त्यानं उघडपणे कबूल केलं की, त्याची धावपळीची जीवनशैली, सततचे दौरे, दिवसातून दोन-तीन शो, रात्री झोप न येणं, सकाळी लवकरच्या फ्लाईट्स आणि अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे त्याच्या आरोग्यावर खोलवर परिणाम होत होता.