बारामती: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बुधवारी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालं. अजित पवारांना मुंबईवरून बारामतीला घेऊन जाणारं विमान लँड करत असताना क्रॅश झालं आणि विमानाचा स्फोट झाला. यात अजित पवार आणि इतर पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत असलेले सुप्रिया सुळे, शरद पवार, सुनेत्रा पवार हे सगळे बारामतीत दाखल झाले. सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार बारामतीत आले त्यावेळी तिथं त्यांचे नातेवाईक राणाजगतिसिंह पाटील तिथं उपस्थित होते. यावेळी सुप्रिया सुळे या विठ्ठलदादा मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजितदादांचा उल्लेख तुमचा एकदम लाडला असा उल्लेख केला. यानंतर त्या मणियार यांच्या गळ्यात पडून रडल्या. यानंतर सुनेत्रा पवार यांना देखील अश्रू थांबवता आले नाहीत. या दोघींनाही विठ्ठल मणियार यांनी आधार दिला आणि त्यांचं सांत्वन केलं.
तर आज विठ्ठल मनियार यांनी लहानपणापासून पाहिलेले अजित पवार आणि आत्ताचं त्यांचं काम याबाबत ते बोलले. विठ्ठल मनियार म्हणाले, शरद पवार आणि माझी मैत्री १९५८ पासूनची आहे तर अजित पवारांचा जन्म १९५९ चा आहे. त्यामुळे अजितला मी त्याच्या जन्मापासून ओळखतो. अजित पवारांच्या वडिलांना काही कारणास्तव घरातून बाहेर पडावं लागलं होतं, त्यामुळे लहानपणापासून अजित पवारांमधे आयसोलेशनची भावना होती. पण शरद पवारांनी त्यांची पुर्ण जबाबदारी घेतली. अजित लहानपणापासून धाडसी होता. कोणतंही काम बेधडक करायचा. शरद पवारांनी ते पाहिलं आणि अजितची निवड केली. अजितला शरद पवारांनी आधी सहकार क्षेत्रात काम करायला सांगितलं. त्यानंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या. अजितची काम करण्याची पद्धत पाहून शरद पवारांना वाटलं की हा आपला सबस्टीट्युट होऊ शकतो, असंही पुढे विठ्ठल मनियार म्हणाले.
तर शरद पवार दिल्ली आणि इतर राजकारण बघत असताना त्यांनी इथली जबाबदारी अजितकडे सोपवली. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर अजित माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की तुम्ही साहेबांशी बोला, कारण आम्हाला साहेब सोबत हवे आहेत. मी त्यानंतर साहेबांशी बोललो, साहेब एवढंच म्हणाले " बघुयात". अजित कुठल्याही पक्षात असले तरी शरद पवारांना वाटतं होतं की हा आपली लेगसी चालवू शकतो. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नव्हती. मात्र दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस राजकिय दृष्ट्या जवळ आल्या होत्या. अजित पवारांच्या जाण्याने शरद पवारांना मोठा धक्का बसला आहे. शेवटी रक्त आहे, असंही पुढे विठ्ठल मनियार म्हणाले.
विठ्ठल सेठ मणियार हे उद्योगपती असून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय आणि जुने कौटुंबिक मित्र म्हणून ओळखले जातात. शरद पवार यांच्या राजकीय जीवनाच्या सुरुवातीपासूनच विठ्ठल मणियार त्यांच्यासोबत आहेत. पवार राजकारणात सक्रिय झाले, त्या पहिल्याच टप्प्यापासून मणियार यांनी त्यांची साथ दिली. दोघांमधील मैत्रीला अनेक दशकांचा इतिहास असून ती आजही तितकीच घट्ट आहे. पवार कुटुंबाशी मणियार यांचे नाते किती जवळचे आहे, याची प्रचिती सुळे यांनी त्यांना मिठी मारून अश्रूंनी व्यक्त केल्याच्या प्रसंगातूनही दिसून आली.
काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत विठ्ठल मणियार यांनी शरद पवार यांच्याशी असलेल्या मैत्रीच्या आठवणी सांगितल्या होत्या. कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी विद्यार्थी प्रतिनिधी पदासाठी शरद पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. “मी ती निवडणूक हरलो, पण त्या पराभवामुळे मला आयुष्यभराचा मित्र मिळाला,” असे ते म्हणाले होते. “मित्र बनवणे सोपे असते, पण शेवटपर्यंत मैत्री टिकवणे कठीण असते,” असेही त्यांनी नमूद केले होते.
विठ्ठल मणियार आणि शरद पवार यांची ओळख पुण्यातील BMCC येथे झाली. त्या कॉलेजमधील गाजलेल्या निवडणुकीत मणियार यांचा पराभव झाला. मात्र दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी निराश झालेल्या मणियार यांची भेट घेत, “लोकांसाठी काम करण्यासाठी पदाची गरज नसते,” असे सांगितले. याच क्षणापासून दोघांमधील आयुष्यभराची मैत्री आणि विश्वासाचे नाते सुरू झाले. पुढे मणियार हे पवार यांचे सर्वात विश्वासू, मात्र राजकारणाबाहेरील सल्लागार ठरले. आज विठ्ठल मणियार हे पवार कुटुंबातीलच एक सदस्य मानले जातात. विद्या प्रतिष्ठान, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांसह पवार कुटुंबाशी संबंधित अनेक प्रमुख संस्थांचे ते विश्वस्त आहेत. गेली सहा दशके महाराष्ट्राच्या सत्ताकेंद्राच्या अगदी जवळ असूनही, त्यांनी कधीही निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही शासकीय पद स्वीकारले नाही.