वडिलांचा मृत्यू, आई घरकाम अन् सॅनिटरी पॅड विकायची; बॉलिवूड अभिनेत्याचा खडतर प्रवास
भाग्यश्री कांबळे January 30, 2026 05:43 PM

Vishal Jethwa Opens Up About His Struggle: ऑस्करच्या शर्यतीत आल्यामुळे 'होमबाउंड' हा चित्रपट चर्चेत आला होता. मात्र, अंतिम नामांकन यादीत चित्रपटाला स्थान मिळवता आले नाही. दरम्यान, या चित्रपटातील कलाकार सध्या चर्चेत आहेत.  अभिनेता विशाल जेठवाने आपल्या उत्तम अभिनयाची शैली या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर सादर केली.  यापूर्वी  विशालने मर्दानी 2 या चित्रपटात उत्कृष्ट अभिनय सादर केला होता.  त्याला खरी ओळख त्याच्या अभिनयातून मिळाली. परंतु, त्याचा इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता.  त्याचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. लहानपणीच  त्याने त्याचे वडील गमावले. त्याच्या आईने त्याला कठोर परिश्रम करून वाढवले. 

विशालने अलिकडेच एका मुलाखतीतून संघर्षमय प्रवासाबाबत माहिती दिली.  त्याच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.  "मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलो आहे.  तुम्ही गरीब कुटुंबही म्हणू शकता. मी हे माझे भाग्य मानतो कारण या घरात मला माणूस म्हणून वाढण्याची संधी मिळाली.  मी मा‍झ्या पालकांचे जवळून जीवन पाहीले आहे.  त्यांचा खडतर प्रवास मी पाहीला आहे", असं अभिनेता म्हणाला.

"मी माझ्या वडिलांना खूप लहान वयात गमावले आहे.  माझ्या आईने मला वाढवले. माझ्या आईला या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागला.  मी आर्थिक संकटाचा देखील सामना केला आहे.  माझे बालपण इतरांसारखे सामान्य नव्हते.  पण या गोष्टी मी जवळून अनुभवल्यामुळे मला अभिनेता होण्यास मदत झाली", असं विशाल म्हणाला. 

बॅकग्राऊंड डान्सर म्हणून प्रवासाला सुरूवात

बालपणाबद्दल विशाल म्हणाला, "मी गुजराती माध्यम शाळेत शिकलो.  मी मालाडमध्ये राहत होतो. सहावीनंतर आम्ही मीरा रोडला राहायला गेलो.  त्यानंतर मी कांदिवलीतील ठाकूर कॉलेजमध्ये गेलो. नववीत असताना मी सारेगमप लिल चॅम्पसमध्ये बॅकग्राऊंड डान्सर होतो.  एकदा या शोमध्ये सलमान खान,  अजय देवगण आणि असिन त्यांच्या लंडन ड्रीम्स चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आले होते.  मी तेव्हा बॅकग्राऊंड डान्स केले. पण तेव्हा मला कळले की हे मला करायचे नाही".

आईनं घेतलेल्या कष्टांबद्दल अभिनेता म्हणाला, "माझी आई घरगुती काम करीत होती.  तिचे बालपण खूप आव्हानात्मक होते.  माझे बालपण तिच्यापेक्षा  चांगले होते.  कारण माझ्या पालकांनी आम्हाला कधीही कोणतीही कमतरता जाणवू दिली नाही.  माझी आई घरकाम करत होती. ती घरोघरी जाऊन साफसफाई करायची.  तसेच सुपरमार्केटमध्ये जाऊन  सॅनिटरी पॅड विकायची.  तर, वडील नारळ पाणी विकायचे.  पण मी परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न केला", अशी भावना विशालने व्यक्त केली.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.